Girish Mahajan on Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोमध्ये (Garbage Depot) मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर खचून एक मोठी दुर्घटना घडली आहे. हा ढिगारा थेट ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी रात्री घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच बचाव कार्याचा आढावा घेत त्यांनी परिस्थितीची माहिती दिली आहे.
या दुर्घटनेनंतर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे हा कचऱ्याचा डोंगर खचला आहे. या इमारतीमध्ये जवळपास 22 लोक अडकले होते. त्यापैकी 5 लोक वरच्या बाजूला होते, ते तात्काळ बाहेर पडले. बाकीचे लोक आत अडकले होते, त्यापैकी 6 ते 7 लोकांना आतापर्यंत सुरक्षित बाहेर काढले आहे. आमच्या टीमचा आतल्या लोकांशी संपर्क सुरू आहे.
Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण…
मंत्री गिरीश महाजन यांनी पुढे सांगितले की, “अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. जास्त पाऊस पडल्याने कचरा डेपोचे पाणी इमारतीमध्ये आल्याने इमारत पडली. अत्यंत कमी कालावधीत 600 मिमी इतका प्रचंड पाऊस पडला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत 6 जणांना बाहेर काढले आहे. तीन लोकांना आतमध्ये जाऊन चहा आणि बिस्किटे दिली आहेत. मात्र, दुर्दैवाने त्यांना सध्या बाहेर काढता येत नाहीये. त्यांचे पाय पिलरखाली अडकलेले आहेत. ते दिसत असूनसुद्धा त्यांना बाहेर काढता येत नाहीये. आणखी जवळपास 12 जण आत असण्याची शक्यता असून, त्यातील तीन जणांपर्यंत आमचा संपर्क झाला आहे. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचा आमचा शर्थीचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दल (Fire Brigade), राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), ‘पीडीआरएफ’ (PDRF) आणि देहूरोड येथील सैन्य दलाच्या तुकड्या (Army Troops) युद्धपातळीवर काम करत आहेत. ढिगारा बाजूला करण्यासाठी पोकलेन मशीनची मदत घेतली जात आहे. पहिल्या मजल्याच्या स्लॅबला छिद्र पाडून जवान आत उतरले असून अडकलेल्या इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?