Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण…


Sharad Pawar and Rohit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात अनुभवी आणि अनेक पावसाळे पाहिलेला नेता म्हणून ख्याती असलेले शरद पवार बुधवारी तब्बल 34 वर्षांनी अधिवेशनकाळात विधिमंडळात आले होते. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या (Belgoan) संदर्भात उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी शरद पवार  (Sharad Pawar) विधिमंडळात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटातील जवळपास सर्व नेते झाडून हजर होते. इतकेच काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दोघेही शरद पवारांच्या स्वागतासाठी आवर्जून उपस्थित होते. या सगळ्या गर्दीत रोहित पवार यांची गैरहजेरी अनेकांच्या नजरेत भरणारी ठरली. दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे (Vinod Tawde) आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची भेट झाली होती. या भेटीत उभय नेत्यांमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए आघाडीत सामील झाल्यास त्यांना काय वाटा मिळेल, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. भाजपसोबत हातमिळवणी करुन महायुतीत सामील होण्याच्या या विचाराबाबत रोहित पवार (Rohit Pawar) नकारात्मक असल्याचे समजते. महायुतीसोबत सत्तेत सामील होण्यास त्यांची नापसंती आहे. परिणामी रोहित पवार नाराज आहे, अशी वदंता आहे. त्यामुळेच काल शरद पवार विधिमंडळात आले असताना रोहित पवार त्याठिकाणी गैरहजर होते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politics news)

या सगळ्यावर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. डोंबिवलीत शिंदे गटाच्या एका नगरसेवकाने सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केली होती. या नगरसेवकावर पोलिसांकडून कारवाई व्हावी, यासाठी मला तिकडे जावे लागले. आम्ही आक्रमक भूमिका घेतली म्हणून नगरसेवकावर लगेच कारवाई झाली. तिथून यायला वेळ झाला म्हणून मी अधिवेशन परिसरात वेळेत पोहोचू शकलो नाही. साहेब ही गोष्ट समजून घेतील. काल शिक्षक आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा मी पवार साहेबांना सांगितला होता. आम्ही सरकारच्याविरोधात भूमिका घेतली आहे, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही. आम्ही लढत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादी-भाजप यांच्यात एकत्र येण्याबाबत अशी कोणतेही चर्चा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्या पदाचा मान ठेवून ते खरं बोलले असं आपल्याला समजावं लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

मात्र, रोहित पवार यांचे हे स्पष्टीकरण अद्याप अनेकांच्या फारसे पचनी पडलेले नाही. शरद पवार तब्बल 34 वर्षांनी अधिवेशनकाळात विधिमंडळात आले असताना त्यांना भेटण्यासाठी पक्षीय भेद विसरुन सगळ्या आमदारांनी गर्दी केली होती. अशात शरद पवार यांचा नातू आणि  त्यांचे राजकारण पुढे नेणाऱ्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेल्या रोहित पवार यांना आजोबांच्या स्वागताला उपस्थित राहण्याऐवजी एका साध्या नगरसेवकावर कारवाई करण्यासाठी घटनास्थळी जाणे इतके महत्त्वाचे का वाटले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

याशिवाय, गेल्या काही दिवसांमध्ये रोहित पवार ग्राऊंडवर उतरुन विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांचे हे दौरे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत. या सगळ्याच्या माध्यमातून ते शरद पवार गटाचा आणि विरोधी गटाचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील झाल्यास रोहित पवार यांची सगळी मेहनत पाण्यात जाईल. तसेच शरद पवार गटाची भाजपसोबत जी कथित बोलणी सुरु आहेत, त्या सगळ्या चर्चेत रोहित पवारांना विचारात घेण्यात आलेले नसावे, अशी चर्चा आहे. त्यामुळे महायुतीसोबत गेल्यास रोहित पवारांना विशेष स्थान किंवा मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे. याच कारणामुळे रोहित पवार महायुतीसोबत जाण्यास राजी नसावेत, अशी शक्यता आहे.

आणखी वाचा

विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *