बाथरूममध्ये हात धुवायला गेला अन् परतलाच नाही; घरातील त्या छोट्या वस्तूने घेतला बारामतीतील 5 वर्षाच्या आयुषचा जीव | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

घराचा लाडका ‘आयुष’ क्षणात सगळ्यांना सोडून गेला. कारण ठरला बाथरूममधील तो हीटर.

चिमुकल्याचा धक्कादायक शेवट (प्रतिकात्मक फोटो)
चिमुकल्याचा धक्कादायक शेवट (प्रतिकात्मक फोटो)

बारामती : घरातील अगदी छोट्या-मोठ्या गोष्टी एक दिवस सगळ्या कुटुंबाचा आनंद हिरावून घेतील, याची कोणी कल्पनाही केलेली नसते. मात्र, अचानक काही अशा घटना घडतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात. अशीच एक घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे. अवघं ५ वर्षांचं वय… अजून त्याने नीट जगही पाहिलं नव्हतं. त्याच्या हसण्या-खेळण्याच्या आवाजाने संपूर्ण घर घुमत होतं, तो घराचा लाडका ‘आयुष’ क्षणात सगळ्यांना सोडून गेला. कारण ठरला बाथरूममधील तो हीटर. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील चंदनगर परिसरात ही काळजाचा ठोका चुकवणारी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे.

बाथरुममधील पाण्याच्या विद्युत हीटरचा जोरदार शॉक लागून आयुष राजू गायकवाड या 5 वर्षांच्या चिमुकल्याचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेने संपूर्ण बारामती तालुका सुन्न झाला आहे.

नेमकं काय घडलं?

गायकवाड कुटुंबीयांनी रोजप्रमाणे आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी बाथरुममध्ये विद्युत हीटर लावला होता. निष्पाप आयुष खेळता खेळता अचानक हात धुण्यासाठी बाथरुममध्ये गेला. बाथरुममध्ये हीटर सुरू असल्याने तिथे विद्युत प्रवाह उतरला होता, याची पुसटशी कल्पनाही त्या लहान जिवाला नव्हती. आयुषने जसा पाण्यात हात टाकला, तसा विजेचा हाय व्होल्टेज धक्का त्याला बसला. वीज प्रवाहाच्या तीव्र झटक्याने तो निष्पाप जीव तिथेच कोसळला. काही वेळाने हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रचंड टाहो फोडला. आयुषला अत्यंत गंभीर अवस्थेत तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकल्याचा असा करुण अंत झाल्याने चंदनगर परिसरात शोककळा पसरली आहे. काळजाचा तुकडा गमावलेल्या माता-पित्याचा आक्रोश पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे काळीज हेलावले. याप्रकरणी शंकर किसन गायकवाड यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने पुन्हा एकदा घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि हीटर वापरताना काळजी घेणं किती गरजेचं आहे, हे अधोरेखित केलं आहे

मराठी बातम्या/पुणे/

बाथरूममध्ये हात धुवायला गेला अन् परतलाच नाही; घरातील त्या छोट्या वस्तूने घेतला बारामतीतील 5 वर्षाच्या आयुषचा जीव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *