Eknath Shinde Shivsena : ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर शिंदे शिवसेनेची पहिली जळजळीत प्रतिक्रिया, ‘तुमच्या मिरवणुकीत मुसा..’ – Marathi News | Eknath Shinde Shivsena Sanjay Shirsat first reaction on uddhav Thackeray ram Raksha andolan ram temple donation theft case


मागच्या काही काही दिवसांपासून राजकीय धक्क्यांवर धक्के पचवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज राम रक्षा आंदोलनाची घोषणा केली. येत्या 5 जुलैला रविवार संध्याकाळपासून राज्यभरात ठाकरे गट शिवसेनेकडून हे आंदोलन सुरु होणार आहे. राम मंदिर दान पेटीतील चोरीचा मुद्दा उचलून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची मशाल हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी दिवंगत भाजप नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका वाक्याची आठवण करुन दिली. ‘अब हिंदू मार नही खायेगा’ असं वाजपेयी म्हणाले होते. आता मी म्हणेन ‘हिंदू माफ नही करेगा’. उद्धव ठाकरे यांच्या राम रक्षा आंदोलनावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.

राम मंदिर दान पेटीतील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्याला शिवसेना नेते, प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं. “राजकारणासाठी पैसा वापरला जातो असं बोलणं बालिशपणा आहे. पूर्वी राणा दाम्पत्यांने हनुमान चालीसा वाचली म्हणून अटक केली, आता हनुमान चालीसा वाचणार, या निमित्ताने तुम्हाला हनुमान चालीसा वाचायला मिळतेय. तुमच्या राजकारणासाठी आता हिंदूची गरज आहे” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

त्यांना तुमचे हिंदुत्व मान्य आहे का विचारा

“तुमच्या मिरवणुकीत नाचणारा मुसा, हे सगळं बेगडी प्रेम आहे. हिंदुंचा नारा देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घ्या. ज्या पक्षाला सोबत घेतले, त्यांना तुमचे हिंदुत्व मान्य आहे का विचारा. सगळ्याच चुकांचा पश्चाताप करण्यासाठी दादरला जाऊन हनुमान चालिसा वाचावी आणि हनुमानाकडे चुकले म्हणून माफी मागा” अशी उपरोधिक टीका संजय शिरसाट यांनी केली.

ते श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांचं

“ज्याने लूट केली असेल, त्याला आम्ही माफ करणार नाही. ही सगळ्यांची भूमिका आहे. जिथे श्रध्दा आहे तिथे लूट होऊ नये. राममंदिराची रथयात्रा अडवाणी यांनी काढली तेंव्हा मोठा प्रतिसाद मिळाला. घुमट पाडल्यानंतर एकमेव शेर, वाघ बाळासाहेबांनी शिवसैनिक असतील तर मला गर्व आहे असं वक्तव्य केलं होतं . त्याचं क्रेडिट घेऊ नका, ते श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे आहे” असं शिरसाट म्हणाले.

हिंदुंशी त्यांचा आता काडीमात्र संबंध नाही

“संघर्षाच्या काळात आम्ही अयोध्येला गेलो होतो. म्हणजे अमित शहा यांना राम पावत नाही तो पर्यंत तुम्ही जाणार नाही असे म्हणायचे का?हनुमान चालीसा वाचून तुम्ही हिंदूंची माफी मागणार आहात का? रामाच्या नावावर राजकारण करण्याची नवी दिशा देण्याचा प्रयत्न करू नये. हिंदुंशी त्यांचा आता काडीमात्र संबंध नाही. अगोदर पक्षाला जागे करा, स्वतः जागे व्हा, आजूबाजूला असलेल्या चांडाळ चौकडीला जागे करा मग देशाचा विचार करा” असा उपरोधिक सल्ला संजय शिरसाट यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *