PM Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज (24 जून) होणार आहे. घडलेल्या दोन घडामोडींमुळे ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. काल (23 जून) सकाळी केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला होता आणि भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. कुरियन हे अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. दरम्यान, काल संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार सोहळ्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. केंद्र सरकार लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल करू शकते, अशी चर्चा आहे. यावेळी आम आदमी पार्टी (आप), तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांना संधी दिली जाऊ शकते.
दोन मंत्र्यांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी नाही
भाजपने नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग बिट्टू यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभा कार्यकाळ 21 जून रोजी संपला आणि त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. रवनीत सिंग बिट्टू यांचा कार्यकाळही संपला आहे, पण त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. नियमांनुसार, बिट्टू खासदार नसतानाही सहा महिने मंत्रीपदी राहू शकतात. रवनीत सिंग बिट्टू यांनी पंजाबच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याची इच्छा असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ते पुढील वर्षी विधानसभा निवडणुका लढवू शकतात आणि त्यांना पंजाबमध्ये काम करायचे आहे.
‘एक व्यक्ती, एक पद’ सूत्राचा परिणाम
भाजपमधील ‘एक व्यक्ती, एक पद’ हे तत्त्वदेखील या फेरबदलाचे एक कारण मानले जात आहे. हर्ष मल्होत्रा यांची नुकतीच दिल्ली भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, ते केंद्रात मंत्रीही आहेत. पंकज चौधरी हे उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष आणि अर्थ राज्यमंत्री आहेत. या नेत्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
फुटीर खासदारांना सामावून घेणे
गेल्या काही महिन्यांत, अनेक विरोधी पक्षातील खासदार फोडण्यात आले असून त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. यामध्ये राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाशी संलग्न असलेल्या सात खासदारांचा समावेश आहे. टीएमसीच्या 28 लोकसभा खासदारांपैकी वीस खासदार त्रिपुराच्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये (एनसीपीआय) विलीन झाले आहेत. या खासदारांनी एनडीएला पाठिंबा दर्शवला आहे. शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांचा समावेश आहे. यापैकी काही खासदारांना सरकारमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
संसदेतील दोन-तृतीयांश बहुमताचे गणित
भाजप आणि एनडीए संसदेतील आपले संख्याबळ आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यातील काही घटनादुरुस्त्यांसाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल, असे मानले जाते. त्यामुळे फोडाफोडी सुरु झाली आहे. पुढील वर्षी पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. परिणामी, भाजप प्रादेशिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळात बदल करू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story