Amchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: प्रसिद्ध अभिनेत्रीचं 8 वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक; ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ नव्या मालिकेत साकारणार मुख्य भूमिका


Amchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: शाळा… हा शब्द उच्चारला की, डोळ्यांसमोर उभी राहतात ती फळ्यावरची अक्षरं, प्रार्थनेचे सूर, मधल्या सुट्टीतला गोंधळ आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घडवणारे शिक्षक. आई-वडिलांनंतर जर कुणी निःस्वार्थपणे आपल्या मुलांसाठी झटत असेल, त्यांच्या चुकांवर मायेने बोट ठेवत असेल, त्यांच्या यशात स्वतःचं सुख शोधत असेल, तर ते असतात शिक्षक. अशीच आपल्या शाळेवर आणि विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करणारी, मायेची ऊब आणि संस्कारांची शिदोरी देणारी एक हाडाची शिक्षिका म्हणजेच नाईक बाई आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

या मालिकेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Actress Aishwarya Narkar) तब्बल आठ वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन करत आहेत.

नाईक बाईंसाठी शाळा म्हणजे चार भिंतींची इमारत नाही, तर ते एक कुटुंब आहे. शाळेची घंटा म्हणजे त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे त्यांचं समाधान. घर, संसार, जबाबदाऱ्या आणि आयुष्याने दिलेल्या अनेक परीक्षांचा समतोल साधत त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वासाची ज्योत पेटवत राहतात. स्वतःच्या अडचणी कधीही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू न देता, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी त्या अहोरात्र झटत असतात. स्वतःचं घर सांभाळतानाच शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचा त्यांचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.

या भूमिकेविषयी ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “आठ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या कुटुंबात परतताना खूप आनंद होत आहे. ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ (Amchya Ladkya Naik Bai) ही फक्त एक व्यक्तिरेखा नाही, तर आपल्या आयुष्यात भेटलेल्या त्या प्रत्येक शिक्षिकेचं प्रतिबिंब आहे, ज्या स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. नाईक बाईंचं विद्यार्थ्यांवरचं प्रेम, प्रत्येक मुलामध्ये उज्ज्वल भविष्य पाहण्याची त्यांची दृष्टी मला खूप भावली. आजही आपण सगळे आपल्या आयुष्यातील एखाद्या आवडत्या शिक्षकाला प्रेमाने आठवतो, तसंच नातं नाईक बाई आणि प्रेक्षकांमध्ये निर्माण होईल अशी मला खात्री आहे. ही भूमिका साकारताना अनेकदा मला माझ्या स्वतःच्या शिक्षकांची आठवण होते. माझ्यासाठी म्हणाल तर आईनंतर बाई अर्थात आमच्या शिक्षिकांना महत्त्वाचं स्थान होतं. तेव्हा तेव्हा त्यांनी शिकवलेल्या बऱ्याच गोष्टी आजही लक्षात आहेत. इतकं प्रेम त्यांनी दिलं की, सणाला आवर्जून त्यांच्या घरी जाणं व्हायचं. आजही मी त्यांच्या संपर्कात आहे. माझ्या कार्यक्रमांना, नाटकांना माझ्या शाळेतल्या बाई आजही आवडीने येतात. त्यामुळेच नाईक बाई ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी खूप खास आहे.”

दरम्यान, नाईक बाईंची हृदयस्पर्शी गोष्ट  ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 10 ऑगस्टपासून सायंकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका पाहता येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Medha Manjrekar Reaction On Cancer: ‘कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी…’; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला ‘तो’ प्रवास





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *