तरुणाला संपवण्यासाठी गोळीबार, पोलिसांचा दणका, जिथे दहशत माजवली तिथेच वरात काढली! | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

शिरूर तालुक्यातील करडे येथे तरुणावर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची शिरूर पोलिसांनी करडे गावातून धिंड काढली गेली.

शिरूर पोलिसांनी गुंडांची दहशत मोडून काढली
शिरूर पोलिसांनी गुंडांची दहशत मोडून काढली

सचिन तोडकर, प्रतिनिधी, शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील करडे गावात जुन्या वादातून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची शिरूर पोलिसांनी मंगळवारी करडे गावातूनच धिंड काढली. या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

नेमकी काय घडली होती घटना?

करडे येथील गोळीबार प्रकरणाला जुन्या वादाची किनार आहे. शनिवारी पहाटे एका तरुणावर पिस्तुलातून थेट तीन राऊंड गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने या घटनेत तरुणाला एकही गोळी लागली नाही आणि तो सुखरूप बचावला. मात्र, भरवस्तीत आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या या गोळीबारामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते.

गावातून आरोपींची धिंड

गोळीबाराच्या या घटनेनंतर शिरूर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून आरोपींना बेड्या ठोकल्या. अटकेनंतर आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन पोलिसांनी तपासाची पुढील प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर गुन्हेगारांमधील भीती संपवून सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींची करडे गावातून धिंड काढली.

पिस्तूल आणि पुरावे जप्त करण्याचे काम सुरू

या गोळीबाराच्या घटनेत वापरण्यात आलेले पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यासाठी पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *