Last Updated:
गुन्ह्यात आरोपीने थेट ‘काळी जादू’ आणि मांत्रिकाचा सहारा घेतल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
छत्रपती संभाजीनगर : व्यावसायिक स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणारी ईर्ष्या माणसाला कोणत्या टोकाला घेऊन जाऊ शकते, याचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार सातारा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. आपल्याच सख्ख्या भावाची आणि मेव्हण्याची हत्या करण्याचा आणि त्यांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याप्रकरणी एका माजी उपसरपंचाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आयुब खान जब्बार खान पठाण असे अटक करण्यात आलेल्या संशयित माजी उपसरपंचाचे नाव आहे. या गुन्ह्यात आरोपीने थेट ‘काळी जादू’ आणि मांत्रिकाचा सहारा घेतल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी आयुब खान पठाण याचे त्याच्या सख्ख्या भावाशी आणि मेव्हण्याशी व्यावसायिक कारणावरून तीव्र मतभेद होते. व्यवसायातील स्पर्धा आणि जुना वाद यांमुळे त्यांच्यात प्रचंड ईर्ष्या निर्माण झाली होती. या वादाचा काटा कायमचा काढण्यासाठी आयुब खान याने दोघांनाही खोट्या आणि गंभीर गुन्ह्यात अडकवून, त्यानंतर त्यांची हत्या करण्याचा कट रचला.
नेमकं काय घडलं?
पोलिस तपासात या कटाबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने हा कट यशस्वी करण्यासाठी अंधश्रद्धेचा मार्ग निवडला. त्याने एका मांत्रिकाची मदत घेतली आणि एका महिलेलाही या कटात सामील करून घेतले. आरोपीने त्याच्या भावाच्या आणि मेव्हण्याच्या फोटोंचा वापर करून काळी जादू (करणी) केल्याचा बनाव रचला. एका निर्जन ठिकाणी झाडावर या दोघांचे फोटो लावत त्यावर धारदार खिळे ठोकण्यात आले होते.
माजी उपसरपंच आयुब खान पठाण याला ताब्यात
या संशयास्पद हालचालींची आणि कटाची माहिती सातारा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून संशयित माजी उपसरपंच आयुब खान पठाण याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने रचलेला हा संपूर्ण कट उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळावरून काळ्या जादूसाठी वापरलेले साहित्य, फोटो आणि खिळे जप्त केले आहेत.
उपसरपंचाच्या कृत्याने राजकीय वर्तुळात तीव्र संताप
अटक करण्यात आलेल्या आरोपी आयुब खान याला सातारा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कटामध्ये केवळ आयुब खान हाच सामील होता की त्याला साथ देणारे आणखी काही पडद्यामागचे सूत्रधार आहेत, याचा शोध सातारा पोलिस घेत आहेत. माजी उपसरपंचाच्या कृत्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हे ही वाचा:
Mumbai,Maharashtra
Jul 17, 2026 10:35 AM IST
नात्याला काळिमा! भावाचा अन् मेव्हण्याचा काटा काढण्यासाठी माजी उपसरपंचाचा खतरनाक प्लॅन; पोलीसही चक्रावले
