मित्रांसोबत महाबळेश्वरला गेला, चुकून एका घरात डोकावलं; मालकाने चिखलात तुडवून घेतला जीव | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे एका पर्यटकाची लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Pachgani
Pachgani

सातारा : दारूच्या नशेत शेजारील घरात डोकावल्याच्या कारणावरून महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे एका पर्यटकाची लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय रमेश जाधव (वय वर्ष 22, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून मुख्य संशयित आरोपीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय जाधव हा त्याच्या काही मित्रांसोबत पाचगणी-महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी आला होता. त्यांनी भोसे गावच्या हद्दीत राहण्यासाठी एक खोली भाड्याने घेतली होती. दरम्यान, अक्षयने प्रमाणाबाहेर दारू पिल्याने तो स्वतःवरचे नियंत्रण गमावून बसला होता. त्याच्या या वर्तनामुळे मित्रांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला आणि खोलीबाहेर जाऊ नये म्हणून त्याला रूममध्ये कोंडून ठेवले. मात्र, काही वेळाने अक्षयने खोलीचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला. दारूच्या नशेत धुंद असलेल्या अक्षयने शेजारीच राहणाऱ्या सूर्यकांत गोळे यांच्या घरात डोकावून पाहिले. आपल्या घरात कोणीतरी अनोळखी व्यक्ती डोकावत असल्याचे पाहून घरातील मुलीने आरडाओरड केली.

नेमकं काय घडलं? 

मुलीचा आवाज ऐकून तिचे वडील सूर्यकांत गोळे आणि वाई परिसरातील त्यांचे काही साथीदार तातडीने तेथे गोळा झाले. अक्षय हा दारूच्या नशेत असल्याचे दिसत असतानाही, संतापलेल्या संशयितांनी त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. संशयित आरोपींनी अक्षयला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पाऊस सुरू असल्याने परिसरात चिखल झाला होता. आरोपींनी अक्षयला चिखलात पाडले आणि तिथेच त्याला निर्दयीपणे तुडवले. या जीवघेण्या मारहाणीत अक्षयच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर अंतर्गत दुखापत झाली व तो जागीच बेशुद्ध पडला.

उपचारापूर्वीच मृत्यू

मित्रांनी मध्यस्थी करत अक्षयला आरोपींच्या तावडीतून सोडवले. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

मुख्य आरोपीसह चौघे गजाआड

या घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मुख्य संशयित आरोपी सूर्यकांत गोळे (रा. भोसे) याच्यासह वाई परिसरातील त्याच्या इतर तीन साथीदारांना अटक केली आहे.पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणी-महाबळेश्वर सारख्या शांत परिसरात घडलेल्या या क्रूर घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *