Nandurbar: डाळ, भात, शेवगा खाल्ला अन् 15 मिनिटांत हॉस्टेलमध्ये आक्रोश; रात्रीच्या जेवणात नेमकं शिजलं काय? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

जेवण झाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांतच अनेक विद्यार्थ्यांना मळमळणे आणि उलट्यांचा तीव्र त्रास जाणवू लागला.

Nandurbar News
Nandurbar News

निलेश पवार, प्रतिनिधी

नंदुरबार: शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रात्रीचे जेवण केल्यानंतर वस्तीगृहातील सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी रात्रीच्या जेवणात डाळ-भात, शेवग्याची भाजी आणि चपाती खाल्ली होती. जेवण झाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांतच अनेक विद्यार्थ्यांना मळमळणे आणि उलट्यांचा तीव्र त्रास जाणवू लागला. काही वेळातच त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने वस्तीगृहात एकच गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बाधित विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.

विषबाधा नेमकी कशामुळे झाली?

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार संभाजी पाटील, प्रांत अधिकारी दीपक गिरासे आणि शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विषबाधा नेमकी जेवणामुळे झाली की अन्य कोणत्या पदार्थामुळे, याबाबत सध्या प्रशासनाकडून विविध शंका उपस्थित केल्या जात असून अधिक तपास सुरू आहे.

 आम्हाला निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते, विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप 

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वस्तीगृहात आम्हाला निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते. या खराब जेवणाबाबत आम्ही यापूर्वीही प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. आज त्याच निष्काळजीपणामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

वॉर्डन आणि शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांचा आक्रोश

इतकी मोठी दुर्घटना घडूनही वस्तीगृहाचे वॉर्डन (गृहपाल) आणि संबंधित शिक्षक रुग्णालयात वेळेवर पोहोचले नाहीत. आपल्या सोबतीची मुले रुग्णालयात वेदनेने विव्हळत असताना जबाबदार व्यक्ती गायब असल्याने उपस्थित विद्यार्थ्यांचा  आक्रोश पाहायला मिळाला. प्रशासनाच्या या बेजबाबदार भूमिकेविरोधात  तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सध्या ग्रामीण रुग्णालयात सर्व विद्यार्थ्यांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून 3 विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर खाजगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

हे ही वाचा :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *