Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. शहादा शहरातील समाज कल्याण वस्तीगृहात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. डाळ भात, शेवगा, चपाती खाल्ल्यानंतर 15 मिनिटांनी विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वस्तीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यातील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अन्न विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु
अन्न विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तहसीलदार संभाजी पाटील, प्रांत अधिकारी दीपक गिरासे, शहादा पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. निष्कृष्ट अन्न देत असल्यामुळं आम्ही या अगोदरही तक्रार केल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. वसतीगृहातील वॉर्डन आणि शिक्षक रुग्णालयात न आल्याने विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे.
ठाण्यातही 55 ते 60 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीदरम्यान अन्नातून विषबाधा
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील वर्तकनगर येथील एका खाजगी शाळेतील सुमारे 160 मुलं सहलीला गेले असताना 55 ते 60 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीदरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्ती आणि शाळा प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि शाळा प्रशासन तसेच महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
खासगी शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना 1 व 2 जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ येथे एका विज्ञान विषयक कार्यक्रमासाठी 160 मुलांना त्या खासगी शाळेतर्फे नेण्यात आले होते. या प्रवासादरम्यान शाळा प्रशासनाने ठरवून दिलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, हा आहार घेतल्यानंतर तब्बल 55 ते 60 विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. परिस्थिती बिघडल्याने अनेक विद्यार्थ्यांना ठाण्यातील इतर खाजगी रुग्णालयांमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करावे लागले. यामुळे पालक वर्गात प्रचंड चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे.
या घटनेनंतर शाळा प्रशासनाने आपली चूक सुधारण्याऐवजी अत्यंत बेजबाबदार भूमिका घेतली असून”तुमच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी पॉवर) कमी आहे,” असे सांगून शाळा प्रशासन पालकांना गप्प करण्याचा आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. एकाच वेळी 55 हून अधिक मुलांना त्रास होणे हा केवळ वैयक्तिक इम्युनिटीचा भाग असूच शकत नाही, हे स्पष्ट असतानाही शाळा आपली जबाबदारी झटकत आहे.उपमहापौर कृष्णा पाटील यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून, शाळा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याऐवजी पालकांकडे दुर्लक्ष केल्याचे पत्रात म्हटले आहे.
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ