Mumbai Marathi : मराठीत बोला, प्रवाशाची टीसीकडे मागणी; RPF स्थानकात प्रवाशाला तासभर बंदिस्त ठेवलं, रेल्वे प्रशासनाची मराठी विरोधी भूमिका


मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एक संतापजनक घटना समोर आली आहे. लोकल प्रवासादरम्यान एका प्रवाशाने टीसीकडे मराठीत बोलण्याची मागणी केली. यावरून झालेल्या वादानंतर रेल्वेच्या टीसींनी (TC) संबंधित प्रवाशाला अंधेरी स्थानकातील कार्यालयात जवळपास एक तास बंदिस्त करून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. 

इतकेच नव्हे तर, त्या प्रवाशाविरोधात ‘सरकारी कामात अडथळा’ आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या संपूर्ण वादात अमराठी टीसींना पाठीशी घालण्यासाठी रेल्वेने एका मराठी टीसीला पुढे केल्याचाही आरोप होत आहे. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अंधेरी पूर्व येथील आरपीएफ (RPF) कार्यालयाबाहेर ‘मराठी एकीकरण समितीचे’ कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी प्रवाशाच्या सुटकेसाठी कार्यालयात धडक दिली.

Andheri Railway Station Marathi Controversy : नेमकं काय घडलं?

एक प्रवासी लोकलमधून प्रवास करताना त्याने तिकीट तपासणीचं काम करणाऱ्या टीसीकडे मराठीत संवाद साधण्याची मागणी केली. महाराष्ट्रात काम करत असाल तर मराठीत संवाद साधा असा आग्रह त्याने केला. त्याचवेळी बाजूला असलेला एक मराठी टीसी तिथे येऊन वाद घालत असल्याचं दिसून येतंय. टीसीकडे मराठीचा आग्रह करत असाल तर तुम्ही व्हॉट्स अॅप मराठीत का वापरत नाही? ते तुम्ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये का वापरता? तुम्हाला मराठी बाराखडी येते का? असा अजब आणि उलट सवाल त्या टीसीने केला.

त्याचवेळी संबंधित प्रवासी हा सातत्याने सांगत होता की, महाराष्ट्रात काम करत असाल तर मराठी येणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण आग्रह धरला. मात्र समोरचा टीसी त्याचं ऐकत नसल्याचं दिसून आलं. तुम्ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये का बोलता, मोबाईलमध्ये ती भाषा का वापरता? असा उलट सवाल तो करताना दिसतोय. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत तो त्या प्रवाशाला कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही देत असल्याचं दिसून येतंय.

दरम्यान, यावेळी संबंधित टीसी हा मोठमोठ्याने, चढ्या आवाजात त्या प्रवाशाला धमकावताना दिसतोय. तुम्ही बाराखडी म्हणून दाखवा, असा आग्रह करत त्याने व्हिडीओ शुटिंगही केल्याचं दिसून आलं.

एखाद्या प्रवाशाने समोरच्या कर्मचाऱ्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तो सरकारी कामात हस्तक्षेप कसा काय ठरतो असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्याचसोबत फक्त मराठीत बोलण्याचा आग्रह केल्यामुळे संबंधित प्रवाशाला कार्यालयात नेण्यात आलं आणि त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्नही झाल्याचं दिसून आलं. सोशल मीडियावरही या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अशा उद्धट वर्तणुकीवर मराठी नेटिझन्सकडून प्रचंड तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *