Suryakumar Yadav News : भारतीय क्रिकेट संघाचा माजी टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र यावेळी त्याच्या फलंदाजीमुळे किंवा मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे, तर पत्नी देविशा शेट्टीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चर्चेत आला आहे. या फोटोतील सूर्यकुमारच्या टी-शर्टवरील एका डिझाइनने चाहत्यांमध्ये विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली असून, सोशल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. देविशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये सूर्यकुमार यादव आपल्या मुलासोबत निवांत वेळ घालवताना दिसत आहे. या कौटुंबिक क्षणात त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. त्या टी-शर्टवर इंग्रजीत कॅप्टन आणि लीडर असे दोन शब्द लिहिलेले होते. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे कॅप्टन या शब्दावर ओढलेली एक आडवी रेषा, तर त्याखालील लीडर हा शब्द स्पष्टपणे दिसत होता.
‘कॅप्टन’ शब्दावर काट… सोशल मीडियावर चर्चांना उधाण
फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी या डिझाइनचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावण्यास सुरुवात केली. अनेकांनी हा टी-शर्ट सूर्यकुमार यादवच्या अलीकडील परिस्थितीशी जोडला. भारताच्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाला निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला. त्याचवेळी एकेकाळी भारताचा टी-20 कर्णधार असलेला सूर्यकुमार यादव संघाबाहेर असल्याने या पोस्टकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जात आहे. काही चाहत्यांचे मत आहे की, कॅप्टन शब्दावर मारलेला काट म्हणजे अधिकृत कर्णधारपद हिरावले गेल्याचा अप्रत्यक्ष संदर्भ असू शकतो, तर लीडर हा शब्द कायम ठेवून नेतृत्व हे पदापेक्षा मोठे असल्याचा संदेश दिला गेला असावा. मात्र या सर्व चर्चा केवळ सोशल मीडियावरील अंदाज असून, त्याला कोणताही अधिकृत आधार नाही.
Special Person ~ Special Tshirt
LEADER SURYAKUMAR YADAV 🐐 pic.twitter.com/muwb4kJgnP
— RoMan (@SkyXRohit1) July 10, 2026
पोस्टच्या टाइमिंगने वाढवल्या चर्चा
या फोटोच्या पोस्टची वेळही चर्चेचा विषय ठरली आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवला सध्याच्या टी-20 संघातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. निवड समितीच्या योजनांमधून अचानक त्याचे नाव गायब झाल्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. याच पार्श्वभूमीवर हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तो निवडकर्त्यांना किंवा संघ व्यवस्थापनाला उद्देशून केलेला. काहींनी मात्र हा केवळ टी-शर्टचा डिझाइन असल्याचे सांगत कोणताही वेगळा अर्थ काढू नये, असे मत व्यक्त केले.
सूर्यकुमार किंवा देविशाकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सूर्यकुमार यादव किंवा त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. टी-शर्टच्या डिझाइनमागे कोणताही विशेष संदेश होता की हा केवळ योगायोग होता, याबाबत दोघांनीही मौन बाळगले आहे. सध्या सूर्यकुमार यादवच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकेकाळी जगातील सर्वात धोकादायक टी-20 फलंदाजांपैकी एक मानला जाणारा आणि भारताचा यशस्वी टी-20 कर्णधार राहिलेला सूर्यकुमार सध्या संघातील मोठ्या बदलांमुळे संघात पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करत आहे.
हे ही वाचा –