Maharashtra Rain Update: मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती


Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग (Heavy Rainfall) सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळत असून, रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही मुंबई आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या पावसामुळे राज्यात नागरिकांचे मृत्यू देखील झाले आहेत.

मुंबईतील मानखुर्द भागात एका चाळीतील तीन मजली घर कोसळून 5 निष्पाप लहान मुलांसह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. याशिवाय कुर्ला आणि गोरेगाव येथे झाडांच्या फांद्या कोसळून दोघांना जीव गमवावा लागला आहे, तर नवी मुंबई आणि पनवेल परिसरात अतिवृष्टीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सोमवारीही पावसाचा हा कहर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

Maharashtra Rain Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांचे हाल

मुंबईच्या पश्चिम उपनगरात पहाटेपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. आज सोमवार असल्याने आठवड्याचा पहिलाच कार्यालयीन दिवस आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (Western Express Highway) प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आणि प्रवासापूर्वी वाहतुकीची स्थिती तपासून घेण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Rain Update: मुंबईची ‘लोकल’ उशिराने! 

पावसाचा मोठा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेला बसला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील लोकल गाड्या सध्या 15 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. वसई, नालासोपारा आणि विक्रोळी भागात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल धीम्या गतीने चालवल्या जात आहेत. तसेच कर्जत-लोणावळा दरम्यान घाटात दरड कोसळल्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींचे मार्ग वळवले आहेत.

Maharashtra Rain Update: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला 

लोणावळा आणि तळेगाव परिसरात सरासरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पाऊस झाला आहे. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) नव्याने बांधण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’च्या (Missing Link) एन्ट्री पॉईंटवर एक मोठा स्लॅब कोसळला. छताचा भाग कोसळल्यामुळे डोंगरावरील राडारोडा थेट रस्त्यावर येत आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू असून, प्रशासनाने आज प्रवाशांना मुंबई-पुणे प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Rain Update: अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

कोकण आणि मुंबई: प्रादेशिक हवामान केंद्राने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पुणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी: पुणे जिल्ह्यासाठीही हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, तर पुणे शहरातील शाळांना महापौर मंजूषा नागपुरे यांनी सुट्टी दिली आहे.

नाशिक: नाशिक जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) देण्यात आला असून घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.

विदर्भ: अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली यांसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update: कोण-कोणते रस्ते आणि महामार्ग बंद आहेत? 

मुंबई – पुणे एक्स्प्रेसवे बंद

मुंबई – पुणे जुना हायवे बंद

मुंबई  – गोवा हायवे चिपळूण खवटीजवळ बंद

रायगडमध्ये पेण-खोपोली मार्ग बंद

रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्ग सुकेळी खिंडीत बंद

रायगड – माणगाव-पाली मार्ग बंद

रायगड – माणगाव-पुणे ताम्हणी घाटमार्ग बंद

आणखी वाचा 

Mumbai Local Train Updates: राज्यभरात मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, तर नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली, मुंबई लोकल सेवाही विस्कळीत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *