Mumbai Rain: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी रस्ते (Roads) आणि रेल्वे मार्ग बंद पडले आहेत. पुणे-मुंबईदरम्यानची वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून रायगड (Raigad), पालघर (Palghar), मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
गिरीश महाजन म्हणाले, “राज्यात अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. रस्ते, रेल्वे मार्ग बंद झाले आहेत. वाहतुकीसाठी पुणे-मुंबई बंद झालाय. रायगड, पालघर, मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस होतोय. शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईत 12 वाजता मंत्रालयात डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक बोलवली आहे. मुंबईत पर्यटन करू नका. थोड्याच वेळात आम्ही काही निर्णय जाहीर करू. वाऱ्यांचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रतितास झाला आहे. मुंबईत झाडं उन्मळून पडत आहेत. अनेक जण बाहेर गर्दी करत आहेत, तसं करू नका.
Girish Mahajan: जर ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल
आज आणि उद्याही काही ठिकाणी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. थोड्याच वेळात कामकाजासंदर्भात निर्णय होईल. आज आणि उद्या अतिवृष्टी आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. धबधब्यांच्या ठिकाणी काही जण गेले आणि त्यांना जीव गमवावा लागला. जर ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल. ही नैसर्गिक आपत्ती आहे, राजकारण न करता सहकार्य करा. कुठे गळायला लागलं तर लगेच राजकारण करू नये. मानखुर्द येथे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. लोक विचलित होतील, असं विरोधी पक्षांनी वागू नये. सातत्याने पाऊस सुरू आहे, धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. मात्र, अद्याप जितका पाहिजे तितका पाऊस धरणक्षेत्रात झालेला नाही. येत्या काळात धरणक्षेत्रातही पाऊस होईल आणि धरणं भरतील,” असे त्यांनी म्हटले आहे.
Mumbai Rain: मुंबईसाठी विशेष सूचना जारी
दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केवळ मुंबईसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत. हवामानाची सद्यस्थिती लक्षात घेता खासगी कार्यालयांनी शक्य असेल तेथे कर्मचाऱ्यांना घरून काम (Work From Home) करण्याची मुभा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय कार्यालये (Government Offices) अर्धा दिवसच कार्यरत राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि अधिकृत सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन SDMA ने केले आहे.
याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील महत्त्वाची सूचना जारी केली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर SDMA ने मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आणखी वाचा