Raigad Rain Update: महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला ‘रेड अलर्ट’, अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद


Raigad Rain Update: रायगड जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) अत्यंत रौद्ररूप धारण केले आहे. दक्षिण रायगडमधील महाड शहरा शेजारून वाहणाऱ्या सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी थेट महाड (Mahad) शहरात शिरले आहे. सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याचा मोठा विळखा महाड शहराला बसला असून येथील मुख्य बाजारपेठ, सुकट गल्ली, दस्तुरी नाका आणि गांधारी नाका परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आजूबाजूची भातशेतीही पूर्णपणे जलमय झाली आहे. हवामान विभागाने (IMD) रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या अशा दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’जारी केला आहे.

Raigad Rain Update: वरंध आणि कशेडी घाटात दरड कोसळली, संपर्क तुटला

मुसळधार पावसामुळे रायगडमधील वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. वरंध घाटात वाघजाई मंदिराजवळ मोठी दरड कोसळल्यामुळे या घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. परिणामी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. दुसरीकडे, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ (Kashedi Tunnel) खवटी येथे रात्री अडीचच्या सुमारास मोठी दरड महामार्गावर कोसळली. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी यंत्रसामग्री अपुरी पडत असल्याने मार्ग कधी सुरू होणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

Raigad Rain Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि ‘मिसिंग लिंक’ ठप्प

अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai Pune Expressway) वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. एक्स्प्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. बोगदा क्रमांक 2 च्या बाहेर पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याने प्रशासनाने पहाटेपासूनच ‘मिसिंग लिंक’वरून जाणारी वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव थांबवली आहे. यामुळे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

Raigad Rain Update: अंबा आणि उल्हास नद्यांना पूर; पाली शहर पाण्याखाली

पाली खोपोली मार्गावर अंबा नदीचे पुराचे पाणी शिरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. श्रीक्षेत्र बल्लाळेश्वर परिसराला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून संपूर्ण पाली शहर, एसटी बस स्थानक आणि भाजी मार्केट अंबा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले आहे. अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी आल्याने खोपोली ते वाकण फाटा वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कर्जत मधील उल्हास नदीला पूर आला असून नदीकिनाऱ्यावर असणारे बेंडसे आणि वावे पूल पाण्याखाली गेले आहेत. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला आहे. बेंडसे गावात नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Raigad Rain Update: प्रमुख रस्ते-महामार्ग बंद

दरम्यान, रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. वरंध घाटातील वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळल्याने पुणे-रायगड संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली असून महाडजवळील केंबुर्ली गावाच्या हद्दीत गुडघाभर पाणी साचल्याने कोकणाकडे जाणारी मार्गिका बंद करण्यात आली आहे. साचलेल्या पाण्यात एक एसटी बस अडकली असून सध्या या महामार्गावरून केवळ अवजड वाहनांची अंशतः वाहतूक सुरू आहे, तर लहान वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

याशिवाय माणगाव–ताम्हिणी घाटमार्गावरील पुण्याकडे जाणारा रस्ता बंद आहे. खोपोली–पेण महामार्गावरील सारसन ते इसांबा फाट्यादरम्यान पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पाताळगंगा आणि भोगावती नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने या मार्गाला मोठा फटका बसला आहे. खोपोली परिसरात पाताळगंगा नदीचे पूरपाणी आजूबाजूच्या भागात शिरले असून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील फूड मॉलमध्येही पावसाचे पाणी साचले आहे. नागोठणे–भिसेखिंड मार्गावर रोह्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पेण–खोपोली महामार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक थांबवण्यात आली असून पेणमधील गणेशमूर्ती कारखानदारांनाही पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.

 

आणखी वाचा 

Maharashtra Rain Update: मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *