रोज घरकामासाठी यायची; पण एक दिवस ती आली अन्… कोथरूडमधील महिलेसोबत मोठं कांड, पोलिसात धाव | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

काही महिला अशाही असतात, ज्या घरात येताच असं काही कांड करतात, ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. पुण्यातून एक अशीच घटना समोर आली आहे.

कोथरूडमधील महिलेसोबत मोठं कांड (प्रतिकात्मक फोटो)
कोथरूडमधील महिलेसोबत मोठं कांड (प्रतिकात्मक फोटो)

पुणे : पुणेकरांनो, घरकामासाठी घरात एखाद्या कामगाराला ठेवताना तुम्ही त्यांची संपूर्ण माहिती घेता का? बहुतेकदा घरकाम करणाऱ्या महिला अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम पूर्ण करत असतात. मात्र, यातील काही महिला अशाही असतात, ज्या घरात येताच असं काही कांड करतात, ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. पुण्यातून एक अशीच घटना समोर आली आहे. यात कोथरूडमधील एका ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरीची धक्कादायक घटना घडली. घरात विश्वासाने कामाला ठेवलेल्या एका घरकाम करणाऱ्या महिलेनेच मालकिणीच्या दोन लाख रुपये किमतीच्या ३ हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्यांवर डल्ला मारला आहे.

याप्रकरणी ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूडमधील उच्चभ्रू अशा महात्मा सोसायटीत राहतात. त्यांनी घरातील एका टेबलवर हिरेजडीत सोन्याच्या तीन अंगठ्या ठेवल्या होत्या. घरात कोणी नसताना आणि ज्येष्ठ महिला कामात व्यग्र असताना, घरकाम करणाऱ्या महिलेने संधी साधून टेबलवरील या मौल्यवान अंगठ्या चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अंगठ्या गायब झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. कोथरूड पोलीस आता या संशयित नोकराणीची चौकशी करत आहेत.

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट

कोथरूडमधील या घटनेव्यतिरिक्त पुणे शहरात आणखी दोन ठिकाणी चोऱ्यांच्या मोठ्या घटना घडल्या असून, पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पिंपळे गुरव येथील एक ज्येष्ठ महिला पुणे-सातारा रस्त्यावरील पीएमपी बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेतला. चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने महिलेच्या हातातील सुमारे १ लाख १० हजार रुपयांची सोन्याची बांगडी कापून लंपास केली. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणीनगरमध्ये कारची काच फोडून चोरी

कल्याणीनगर भागात शनिवारी एक वेगळीच घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारची काच चोरट्यांनी शिताफीने फोडली आणि कारच्या आत ठेवलेले १ लाख ५० हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/

रोज घरकामासाठी यायची; पण एक दिवस ती आली अन्… कोथरूडमधील महिलेसोबत मोठं कांड, पोलिसात धाव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *