पुण्यात मुसळधार पाऊस, रावेतमध्ये १०० तासांपासून वीज गायब, खासदार बारणेंना स्थानिकांचा घेराव, प्रश्नांचा भडिमार | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

मुसळधार पावसामुळे गेल्या १०० तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त झालेल्या रावेत येथील रहिवाशांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान नागरिकांनी स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांना घेराव घालत दीर्घकाळ चाललेल्या वीज खंडिततेबाबत थेट जाब विचारला.

श्रीरंग बारणे यांना स्थानिक नागरिकांचा घेराव
श्रीरंग बारणे यांना स्थानिक नागरिकांचा घेराव

गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रावेत परिसरातील वीज यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. तब्बल १०० तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रस्त आणि संतप्त झालेल्या रावेत येथील नागरिकांनी आज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान नागरिकांनी स्थानिक शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना घेराव घालत, विजेच्या अडचणीबाबत थेट जाब विचारला.

गेल्या चार दिवसांपासून वीज नसल्याने रावेतमधील सोसायट्या आणि स्थानिक नागरिकांचे हाल बेहाल झाले आहेत. पाण्याचा पुरवठा खंडित झाला असून, दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. महावितरण आणि स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचा संयम सुटला.

आज शेकडो नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाचा निषेध केला. आंदोलकांनी हातात ‘सेवा नाही तर कर नाही’ असे फलक झळकावत मूलभूत सेवा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

खासदार श्रीरंग बारणे यांना घेराव

आंदोलनाची माहिती मिळताच खासदार श्रीरंग बारणे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. मात्र, संतप्त नागरिकांनी त्यांना थांबवून थेट प्रश्नांचा भडीमार केला. १०० तास वीज नसताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय करत आहेत? आम्ही नियमित कर भरूनही आम्हाला अंधारात का राहावे लागत आहे? असा थेट जाब नागरिकांनी खासदारांना विचारला. नागरिकांचा वाढता रोष पाहून काही काळ आंदोलनस्थळी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

‘…तर टॅक्स भरू नका’, खासदारांचे प्रशासनावर खापर

जनतेच्या या तीव्र नाराजीला आणि रोषाला सामोरे जाताना खासदार श्रीरंग बारणे यांनी नागरिकांच्या भूमिकेचे थेट समर्थन केले. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त करत बारणे यांनी स्थानिकांच्या सुरात सूर मिसळला. जर नागरिकांना वीज आणि पाण्यासारख्या अत्यंत मूलभूत आणि आवश्यक सेवाच पुरवल्या जात नसतील, तर त्यांनी कर का भरावा? नागरिकांनी कर भरू नये, नागरिकांच्या भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे बारणे म्हणाले.

खासदार बारणे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले असून, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, जोपर्यंत वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलक नागरिकांनी घेतला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

पुण्यात मुसळधार पाऊस, रावेतमध्ये १०० तासांपासून वीज गायब, खासदार बारणेंना स्थानिकांचा घेराव, प्रश्नांचा भडिमार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *