Pune Rain Updates: पुण्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा रेड अलर्ट, सिंहगड पर्यटकांसाठी बंद; तर मावळमध्ये ‘माळीण’ची पुनरावृत्ती, भूस्खलनात कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडलं


Pune Rain Updates: भारतीय हवामान विभागानं (IMD) पुणे जिल्ह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंहगड घाट परिसर हा दरडप्रवण (Landslide Prone) क्षेत्र असल्यानं मुसळधार पावसामुळे दरड कोसळणं, झाडं उन्मळून पडणं, दगड घसरणं, रस्त्यावर पाणी साचणं आणि इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिक, पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सिंहगड घाट परिसरातील पर्यटकांचा प्रवेश आज आणि उद्या दिनांक 6, 7 जुलै रोजी तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाची परिस्थिती पाहून 8 जुलैला सिंहगड किल्यावर पर्यटकांना प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवण्यात येईल, असं प्रशासनानं म्हटलंय. पुढील सुचनांनंतरच वाहतूक सुरळीत करण्याबाबत विचार केला जाईल.

पुणे आणि मुंबई वाहतूक पूर्णतः ठप्प, मिसिंग लिंकवर दरड तर द्रुतगतीवर पाणीच पाणी (Landside On Mumbai Pune Expressway)

पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. नव्यानं खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली आहे. आधीच्या द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणीचं पाणी साचलेलं आहे. तसेच, जुन्या पुणे-मुंबई महार्गावर दरड कोसळलेली आहे. त्यामुळं पुणे आणि मुंबई महामार्गावरुन प्रवास करणं आज अशक्य आहे. दुसरीकडे पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळली आहे. यामुळं हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. त्यामुळं पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिलाय.

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दरड, वाहतूक विस्कळीत (Landslide On Pune-Mumbai Railway Route)

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर मुसळधार पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. खंडाळा ते मंकी हिल आणि ठाकूरवाडी दरम्यान रेल्वे रुळांवर अनेक ठिकाणी दगड आणि माती वाहून आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. परिणामी मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई मार्गावरील पाच लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिली आहे. रेल्वे प्रशासनाकडून रुळांवरील माती आणि दगड हटविण्याचे युद्धपातळीवर काम सुरू असून, प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मावळमध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली कुटुंब गाडलं गेलं (Landslide in Maval Pune, Family Buried Under Debris)

पुण्यातील मावळ तालुक्यातील पाठण गावात दुर्दैवी घटना घडलीये. अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळून या गावातील एक कुटुंब गाडलं गेलंय. नंदू तिकोणेंच्या कुटुंबावर काळरात्र चालून आली आहे. नंदू तिकोने, पत्नी आणि मुलगा घरात असताना काळाने घाला घातला. या तिघांचा शोध सुरु एनडीआरएफ पथकाकडून सुरुये. एकाचा मृतदेह सापडला आहे. 

पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद (Pune Mumbai ST Bus Services Suspended)

पुणे-​मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे, पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची सर्व एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या 4 एसटी बसेस ‘उर्से टोल नाका’ परिसरात अडकल्या होत्या, त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आले आहे. कृपया प्रवाशांनी सहकार्य करावे आणि रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवासाचे नियोजन करू नये, अशी माहिती एसटी पुणे विभागाचे वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिलीय. 

पुणे-महाड महामार्गावर दरड कोसळल्याने वरंधा घाटातून होणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प

पुणे-महाड महामार्गावर दरड कोसळली असून त्यामुळे वरंधा घाटातून होणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झालीय. वरंधा घाटात 4 ते 5 ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वरंधा घाटातील वारवंड ते उंबर्डेवाडी दरम्यान 4 ते 5 ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे या पुणे भोर महाड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा भागांत जवपास 200 मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर दरड हटविण्याचं काम सुरू आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Maharashtra Rain Update: मुंबई-गोवा महामार्गावर आणखी एक दरड कोसळली, परिस्थिती गंभीर, वाहतूक ठप्प, 24 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा

पाहा व्हिडीओ :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *