मुंबई : राज्याची राजधानी असल्याने मुंबईचं (Mumbai) आकर्षण महाराष्ट्रातील सर्वांनाच असते, याशिवाय जगभरातून पर्यटक येथे येतात. त्यामुळे, मुंबईची सुरक्षा आणि मुंबईतील सर्वच सुविधांवर नेहमीच चर्चा होते. त्यातच, मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबईतच आपल्याला अधिकृत निवासस्थान देण्याची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, मुंबईच्या रस्त्यातील खड्डे आणि इतर बाबींचा उल्लेख करत आपणास महापौर (Mayor) बंगल्याजवळच निवासस्थान देण्यात यावे, अशी मागणी उपमहापौर घाडी यांनी केलीय
उपमहापौर संजय घाडी यांच्या मागणीनंतर या मुद्द्यावर कायदेशीर तरतुदींची चर्चा सुरू झाली आहे. उपलब्ध कायदेशीर तरतुदीनुसार, मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 या प्रमुख कायद्यांमध्ये उपमहापौरांना अधिकृत निवासस्थान देणे बंधनकारक असल्याची कोणतीही स्पष्ट तरतूद नाही, अशी बाब समोर आली आहे. या कायद्यांमध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीची प्रक्रिया, कार्यकाळ (साधारण अडीच वर्षे), अधिकार, कर्तव्ये तसेच मानधन व काही भत्त्यांचा उल्लेख आहे. मात्र, उपमहापौरांना अधिकृत शासकीय किंवा महापालिकेचे निवासस्थान उपलब्ध करून देण्याबाबत कोणतेही स्पष्ट प्रावधान करण्यात आलेले नाही. त्यामुळे, आता संजय घाडी यांच्या निवासस्थानाच्या मागणीवर महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.
सर्वसामान्य मुंबईकरांचा खोपोली ते मुंबई प्रवास
दरम्यान, एकीकडे दररोजच्या नोकरी-व्यवसायासाठी रस्तेप्रवास करताना सामान्य नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या वाहतूक कोंडीच्या यातनांच्या कळा आता लोकप्रतिनिधींनाही असह्य झाल्या आहेत. खोपोली-कसाऱ्यापासून ते डहाणूपासून मुंबईत कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी दररोज प्रसंगी जीव धोक्यात घालणाऱ्या मुंबईकरांच्या व्यथेवर वर्षानुवर्षे साधी फुंकरही घातली गेलेली नाही. लोकलच्या गर्दीत जीव मुठीत धरुन मुंबईकर, प्रवास करतात पण केवळ आकडेवारी आणि संख्यात्मक मोजणीच चाकरमान्यांची केली जाते. तर, दुसरीकडे उपमहापौर संजय घाडी यांनी आरोग्याच्या कारणांसह कामकाजाच्या सोयीसाठी अधिकृत निवासस्थानाची मागणी केली आहे. या मागणीवर प्रशासन आणि सत्ताधारी काय भूमिका घेतात, तसेच यासाठी स्वतंत्र धोरण किंवा विशेष निर्णय घेतला जातो का, याकडे आता लक्ष लागले आहे.
उपमहापौरांच्या पत्रात काय?
उपमहापौर संजय घाडी यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “मुंबई महानगरपालिकेच्या उप महापौर पदाची धुरा सांभाळीत असताना, दैनंदिन कामकाजाच्या अनुषंगाने विविध महत्त्वाच्या प्रशासकीय बैठका, चर्चासत्रे, महापालिका सभा, उप महापौर कार्यालयात येणारे नागरिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, अभ्यागतांच्या भेटी व प्रशासकीय कार्यक्रमांना वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक असते. परंतु, मी दहिसर (पूर्व) येथे वास्तव्यास असल्याने, दहिसर येथून महापालिका मुख्यालय येथे दैनंदिन वाहनाने ये-जा करण्यासाठी प्रवासामध्ये माझा बराच वेळ व्यतीत होत आहे.”
हेही वाचा
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से