बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला;2 महिन्यांनंतर नशीब फिरलं, OTT वर येताच ‘या’ फिल्मचा टॉप 10 मध्ये धुमाकूळ


OTT Trending Film: चित्रपटगृहांमध्ये अपेक्षित यश न मिळालेले अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर नव्याने प्रेक्षकांची पसंती मिळवतात. त्यामुळे ओटीटीला चित्रपटांचं दुसरं आयुष्य असंही म्हटलं जातं. असाच अनुभव यंदाच्या एका रोमँटिक ड्रामा चित्रपटाला आला आहे. थिएटरमध्ये फारशी कमाई न करू शकलेला हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच टॉप 10 ट्रेंडिंग यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘पति पत्नी और वो दो’ हा चित्रपट कमी बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर त्याला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कमाईही अत्यंत निराशाजनक झाल्याने हा चित्रपट फ्लॉप ठरला.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच ट्रेंडिंगमध्ये

बॉक्स ऑफिसवरील अपयशानंतर हा चित्रपट 10 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. ओटीटीवर रिलीज होताच चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत त्याने स्थान मिळवलं आहे. इतकंच नाही, तर सध्या हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होत असल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

या चित्रपटाची कथा प्रयागराजमध्ये राहणाऱ्या एका वनअधिकाऱ्याभोवती आणि त्याच्या पत्रकार पत्नीभोवती फिरते. मुख्य पात्र आपल्या महाविद्यालयीन मैत्रिणीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतं. मात्र, त्या मैत्रिणीचे वडील प्रभावशाली असल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनते. मैत्रिणीला मदत करण्यासाठी तो काही खोटं बोलतो. याच दरम्यान त्याच्या पत्नीला त्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचा संशय येतो. त्यानंतर गैरसमज, विनोदी प्रसंग आणि खोट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या नायकाची धडपड याभोवती चित्रपटाची कथा पुढे सरकते.

स्टारकास्ट काय?

‘पति पत्नी और वो दो’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटात आयुष्मान खुराना, वामिका गब्बी, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केलं आहे. थिएटरमध्ये अपयशी ठरलेल्या या चित्रपटाला मात्र ओटीटीवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *