Indian Cricketer Vipraj Nigam Harassment Case News : भारतीय क्रिकेटपटू विप्रज निगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल करणारी महिला अचानक त्याच्या घरी पोहोचल्याचे वृत्त आहे. संबंधित महिला तब्बल दोन ते तीन तास घराबाहेर गाडीत बसून विप्रजची भेट होण्याची वाट पाहत होती, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला विप्रजच्या घरी पोहोचली तेव्हा घरात त्याची आई उपस्थित होती. विप्रज सध्या भारतीय संघासोबत आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये असल्याने त्याची तिच्याशी भेट होऊ शकली नाही. यानंतर विप्रजच्या वडिलांनी संबंधित महिलेशी फोनवर संवाद साधला. या प्रकरणावर एका आठवड्यात चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ती महिला तेथून परतल्याचे सांगितले जात आहे.
दोन्ही बाजूंनी पोलिसांत गुन्हे दाखल
या प्रकरणात दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. विप्रजने 8 नोव्हेंबर 2025 रोजी बाराबंकी पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला होता. ती महिला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन करून आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप विप्रजने केला होता. यानंतर 16 डिसेंबर 2025 रोजी संबंधित महिलेने गौतम बुद्ध नगरमधील एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात विप्रजविरोधात तक्रार दाखल केली.
महिलेने काय आरोप केले?
संबंधित महिलेच्या आरोपानुसार, तिची आणि विप्रजची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. मे 2025 मध्ये त्यांची भेट झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याचा तिचा दावा आहे. तिच्या आरोपानुसार, 29 जुलै 2025 रोजी नोएडाच्या सेक्टर 135 मधील एका हॉटेलमध्ये विप्रजने लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर बलात्कार केला. मात्र, हे आरोप अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध झालेले नाहीत. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी आरोप केले असून, पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
शेवटच्या क्षणी मिळाली भारतीय संघात संधी
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या सुरुवातीच्या योजनांमध्ये विप्रज निगमचा समावेश नव्हता. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान वरुण चक्रवर्ती जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी विप्रजचा संघात समावेश करण्यात आला. विप्रज हा लेग-स्पिन अष्टपैलू खेळाडू असून, तो उजव्या हाताने लेग-ब्रेक गोलंदाजी करतो. फलंदाजीतही मोठे फटके मारण्याची त्याची क्षमता आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. UPT20 लीगमध्ये तो लखनौ फाल्कन्सकडून, तर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो.
हे ही वाचा –