CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 


चेन्नई : आयपीएलमधील यशस्वी टीम असा नावलौकिक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) आयपीएलच्या 2027 (IPL 2027) च्या हंगामासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) याची निवड केली आहे. स्टीफन फ्लेमिंग यानं चेन्नईची साथ सोडत इंग्लंडच्या कसोटी संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं. त्यामुळं रिक्त झालेल्या जागेवर झहीर खानची निवड करण्यात आली आहे. चेन्नईनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन ही अपडेट दिली आहे.  

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू स्टीफन फ्लेमिंग यानं 18 वर्ष चेन्नई सुपर किंग्जचं मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलं. आता फ्लेमिंगच्या जागेवर चेन्नईनं झहीर खान याची निवड केली आहे. झहीर खान यानं 2017 मध्ये रिटायर झाल्यानंतर आयपीएलमध्ये विविध संघासोबत काम केलं आहे.  

झहीर खान IPL 2019 मध्ये मुंबई इंडियन्सच्या ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स’ पदावर कार्यरत होता. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सच्या ‘ग्लोबल डेवलपमेंट’ चा हेड बनला. IPL 2025 झहीर खान यानं लखनौ सुपर जायंटसचं मेंटरपद स्वीकारलं. मात्र 2026 च्या हंगामापूर्वी त्यानं ते पद सोडलं. 

झहीर खानचं आयपीएल करिअर

झहीर खान यानं आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आयपीएलमध्ये त्यानं 100 सामने खेळले आहेत, यापैकी 99 सामन्यांमध्ये गोलंदाजी करत 102 विकेट घेतल्या. झहीर खानची सरासरी 27.27 इतकी आहे. 17 धावांमध्ये 4 विकेट ही झहीर खानची सर्वोत्तम कामगिरी होती तर इकोनॉमी 7.58 होती.  

झहीर खान भारताच्या 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. झहीर खान यानं भारतासाठी 92 कसोटी सामने खेळले आहेत. 200 एकदिवसीय सामने आणि 17 टी 20 सामने भारतासाठी खेळले आहेत. झहीर खान यानं भारतासाठी 14 वर्ष क्रिकेट खेळलं आहे.  

झहीर खान यानं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाचा भाग होणं अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं. एक क्रिकेट खेळाडू म्हणून मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा सामा केला आहे आणि त्याचा आनंद घेतला आहे. चेपॉकमध्ये चेन्नईचे चाहते जे वातावरण निर्माण करतात ते खास असतं. या संघाचा भाग होण्यासाठी उत्साही आहे, असंही झहीर खान यानं म्हटलं.  





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *