Last Updated:
Girija Raut On Vinayak Raut : शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
ठाणे: शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आला असून, त्यांच्या सुनेने सासरच्यांवर आणखी काही अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “माझे सासरे विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नी आणि मुलीसह दुसऱ्या घरात सुखात राहतात. मात्र, आम्हाला ज्या घरात ठेवले ते झोपडपट्टीत आहे. लग्नाच्या बोलणीदरम्यान आम्हाला हे कधीही सांगण्यात आले नव्हते,” असा खळबळजनक दावा विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
याप्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर कौटुंबिक छळ आणि ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षातून फक्त दोनच दिवस सासऱ्यांची घरी भेट…
कुटुंबप्रमुख म्हणून विनायक राऊत यांनी कधीही जबाबदारी पार पाडली नसल्याचा आरोप गिरीजा राऊत यांनी केला. त्या म्हणाल्या, “विनायक राऊत हे वर्षभरात फक्त दोनच दिवस आमच्या घरी यायचे. एक म्हणजे नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी आणि दुसरा दसऱ्याला घट उठतात त्या दिवशी घरी यायचे. या दोन दिवसांशिवाय ते कधीही आमच्या घरी आले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
गिरिजा राऊत यांनी म्हटले की, ते नेहमी मला फोनवरूनच अमुक-तमुक गोष्टी कर, अशी जबाबदारी घे, असे सांगायचे. पण त्यांनी कधीही त्यांचा मुलगा गितेश आणि पत्नीला समजावून सांगितले नाही. त्यांनी कधीही पुढाकार घेऊन आम्हाला योग्य वागणूक दिली नाही. त्यांच्या याच वागणुकीमुळे मुलाचा आणि सासूचा राग व मनस्ताप माझ्यावर अधिक प्रमाणात निघायचा, असं गिरिजा राऊत यांनी म्हटले.
“पैसे उकळायचे असते तर ७ वर्षांत बऱ्याच संधी होत्या”
विनायक राऊत यांनी केलेल्या आर्थिक मागण्यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना गिरीजा राऊत म्हणाल्या, “मी सात वर्षे त्या घरात राहिले. माझ्याकडे बऱ्याच संधी होत्या, ज्याचा वापर करून मी पैसे उकळू शकले असते किंवा इतर गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकले असते. पण माझा हेतू तसा कधीच नव्हता. माझ्या अगदी साध्या अपेक्षा होत्या, माझ्या नवऱ्यासोबत सुखी संसार करणे आणि आनंदाने नांदणे. मात्र, तसे न करता त्यांनी माझा शारीरिक, मानसिक छळ केला आणि माझे आयुष्य अपमानित करून सोडले.”
Thane,Maharashtra
