नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ संजू सॅमनसला टी 20 संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याच्या निर्णयावर संतापला आहे. संजू सॅमसनला वगळणं टीम इंडियाची मोठी चूक असल्याचं कैफ म्हणाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं तिसरा सामना गमावला. यानंतर कर्णधार, प्रशिक्षक यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संजू सॅमसनला दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये वगळून वैभव सूर्यवंशीला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. मोहम्मद कैफ यानं अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी दीर्घकालीन विचार केला असता भारताचे सलामीवर असू शकत नाही, असंही म्हटलं.
Team India : टीम इंडियाकडून पुन्हा चूक
एबीपी न्यूजचे प्रतिनिधी रवीश बिष्ट यांच्यासोबत बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला की, भारतीय क्रिकेट टीम तिच चूक करत आहे जी वर्ल्ड कपमध्ये केली होती. वर्ल्ड कपमध्ये ईशान किशन आणि अभिषेक शर्माद्वारे डावाची सुरुवात करण्यात आली होती. विरोधातील संघानं फिरकीपटू आणले आणि अभिषेक शर्मा तीन वेळा शुन्यावर बाद झाला. ईशान किशन देखील बाद झाला. वर्ल्ड कप दरम्यान आम्ही सांगत होतो दोन डावखुरे फलंदाज पुरेसे नाहीत. तुम्हाला एका राइट हँड फलंदाजाची गरज आहे. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला नाही तोपर्यंत संजूला संधी मिळाली नव्हती, असंही कैफनं म्हटलं.
आयर्लंड विरोधातील मालिकेत पराभव झाल्यानंतर झालेल्या बदलांबाबत देखील कैफनं भाष्य केलं. आपण जेव्हा आयर्लंड विरोधात पराभूत झालो तेव्हा वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णाला हटवण्यात आलं. असाच प्रकार टी 20 वर्ल्ड कपमध्ये झाला होता. मला म्हणायचंय की जेव्हा टीमचं व्हिजन दीर्घकाळीन असतं तेव्हा टीम दीर्घकाळ वाट पाहत नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोपर्यंत पराभव झाला नाही तोपर्यंत संजू सॅमसनला संधी मिळाली नाही. झिम्बाब्वेचा गोलंदाज सिंकदर रजा संजू सॅमसन असल्यानं गोलंदाजी करण्यास आला नव्हता. एक लेफ्ट हँड फलंदाज आणि एक राइट हँड फलंदाज कॉम्बिनेशन वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाचं ठरलं. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यामुळं भागीदारी होण्यास मदत झाली, असंही कैफनं म्हटलं.
कुलदीप यादवला वगळणे चूक
मोहम्मद कैफ म्हणाला की वारंवार चूक केली जात आहे. अभिषेक शर्मा- वैभव सूर्यवंशी लाँग टर्मसाठी टीम इंडियाचे सलामीवीर होऊ शकत नाहीत. याशिवाय कुलदीप यादवला वगळणं देखील चुकीचं असल्यानं कैफनं म्हटलं. रवि बिश्नोई कुलदीप यादवच्या जवळपास देखील नाही. कुलदीप यादवनं टी 20 मध्ये 95 विकेट घेतल्या असून इकोनॉमी 7 पेक्षा कमी आहे. कुलदीप यादवच्या जवळपास कोणी नाही. एक आयपीएल खराब गेल्यानं त्याला संघातून वगळलं जाऊ नये, असंही कैफ म्हणाला.