Nashik Crime News: नाशिक शहरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकरोड परिसरातील (Nashik Road) जेलरोड (Jail Road) भागात एका पतीने स्वतःच्याच पत्नीची आणि पोटच्या मुलाची ब्लेड सदृश चाकूने गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी पतीने स्वतःही विषारी औषध सेवन करून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरले असून परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Nashik Crime News: माय-लेकाचा मृत्यू; पतीची प्रकृती चिंताजनक
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित पतीने धारदार ब्लेड सदृश शस्त्राने पत्नी आणि मुलाच्या गळ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, माय-लेकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पतीने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पतीला तातडीने नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या पतीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
Nashik Crime News: कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू
या दुहेरी हत्येमागचे नेमके कारण काय होते? कौटुंबिक वाद होता की आर्थिक विवंचना, हे अद्याप अस्पष्ट आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nashik Crime News: इंदिरानगरमध्येही धक्कादायक घटना
दरम्यान, नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीच्या हत्येनंतर संशयित आरोपीचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणी वैष्णवी अनिल आवारे ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असून ती 15 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आली होती. शुक्रवारी रात्री वनसंपदा सोसायटीच्या गार्डनजवळ संशयिताने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. दरम्यान, शनिवारी पहाटे इंदिरानगर परिसरातील जॉगिंग ट्रॅकवर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत संशयित तरुणाचा मृतदेह आढळून आला. तरुणीची हत्या केल्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा