Delhi Parliament March CJP: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 31 वा दिवस आहे. आज कॉकरोच जनता पार्टीने (CJP) संसदेवर मोर्चा काढायचे ठरवले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील आंदोलकांना जागेवरच रोखून धरले आहे. जंतरमंतरवरुन एकाही आंदोलकाला (Jantar Mantar Protest) बाहेर पडून देण्यात आले नव्हते. मात्र, देशभरातून जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेकजण दिल्लीत येत आहेत. यापैकी आंदोलकांचा एक गट थेट संसद भवनाच्या दिशेने गेला. त्यामुळे सध्या संसदेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. हे आंदोलक संसदेच्या गेटपर्यंत पोहोचले नसले तरी तिथून काही अंतरावरच आहेत. त्यामुळे संसद भवनातील पूर्ण सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहे. (Delhi Protest news)
आंदोलकांनी घुसखोरी केल्यास त्यांना रोखायला बंदुकी घेऊन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. संसद भवनातील सुरक्षारक्षकांनी सीजेपीचे काही आंदोलक जवळ आल्याचे समजताच धावत जाऊन संसद मार्गावरील गेट बंद केले. त्यानंतर काही सुरक्षारक्षक या गेटच्या दिशेने बंदुका रोखून तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, आंदोलकावर पाण्याचा मारा करण्यासाठी मोठे पाईप्सही याठिकाणी आणण्यात आले आहेत. दरम्यान, हे आंदोलक संसदेच्या गेटपर्यंत पोहोचू नये, यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. त्यामुळे सध्या संसदेच्या परिसरात मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. अभिजीत दिपके यांनी आज संसदेवर धडकण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना जंतरमंतरवरुन बाहेर पडून दिले नाही. परंतु, या सगळ्या सुरक्षा यंत्रणांना चकवून एक गट संसदेच्या परिसरात पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
संसदेच्या परिसरात जाऊन धडकलेल्या या आंदोलकांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या आंदोलकांना रोखण्यासाठी सध्या पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. हे आंदोलक संसदेपासून अवघ्या 150 मीटरच्या अंतरावर आहेत. संसदेच्या आतमध्ये सुरक्षेची जबाबदारी असलेली सीआयएसएफ हाय अलर्टवर आहे. सध्या विजय चौकाच्या बाजूचे संसदेच्या गेट कुलूप लावून बंद करण्यात आले आहे. दरम्यान, काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन तापले असताना या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी असणारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. या चर्चेनंतर धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
आणखी वाचा
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम