Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीमध्ये सध्या मोठ्या गोंधळाचं चित्र दिसून येत आहे. दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जंतरमंतरवर पोलीस आणि सुरक्षा दलांनी आक्रमक स्वरुप धारण केले आहे. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आज संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरपासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली होती. यावरुन दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. त्यामुळे शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आंदोलकांवर लाठीमार केला. या सर्व घडामोडींच्या दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) हे सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. प्रधान अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, या भेटीत काय चर्चा होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, कारण सीजेपीच्या आंदोलनाची मुख्य मागणी ही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा आहे तर त्याला पार्श्वभूमी आहे नीट पेपरफुटीची, त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेच्या दिशेने मोर्चा सुरू असतानाच, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, ‘सीजेपी’च्या (CJP) मागण्यांनुसार ते आपल्या पदाचा राजीनामा देतील का?.
Arvind Sawant : त्यांना जरा तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल, तर…
तर या भेटीबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले की, “त्यांना जरा तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल, तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी तो दिला असता तर हे प्रकरण इतकं वाढलं नसतं. त्यांची ती एकच तर मागणी होती, त्यात एवढं काय मोठं होतं? त्याने देशाचं काय नुकसान होणार होतं? जाणीवपूर्वक अशा पद्धतीने आंदोलकांना मारहाण करण्यापर्यंत तुमची मजल जाते? शांततापूर्ण आंदोलन झालं होतं, काल शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईत आंदोलन करण्यात आलं, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं, त्यानंतर आता अनेक ठिकाणी तरुण वर्ग रस्त्यावर उतरला आहे. तुम्ही जितक्या बळाचा वापर कराल, तितक्याच तीव्र प्रतिक्रिया उमटतील हे लक्षात ठेवा,” असा इशाराही सावंत यांनी पुढे दिला.
“आंदोलकांशी बोलायला सरकारला नक्की काय अडचण आहे कोण जाणे? आम्हाला याचं आश्चर्य वाटतंय. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर इंदिरा गांधींनी वांगचुक यांच्या वडिलांना पाणी पाजून आंदोलन थांबवलं होतं. आता २० ते २२ दिवस उलटून गेले तरी सरकार चर्चा करायला तयार नाही. आज अधिवेशनादरम्यान आम्ही यावरूनच गोंधळ घातला आहे. नक्की काय चाललं आहे? हे तरुण देशाचं भविष्य आहेत, मग त्यांना असं का तुडवलं जातंय? या घटनेचा निषेध करावा तितका थोडाच आहे. त्यामुळे त्यांना जरा तरी जनाची नाही तर मनाची लाज असेल, तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे,” अशी जोरदार टीका अरविंद सावंत यांनी केली.
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम