Mumbai Jain Community White Line Controversy: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक (YouTuber Prasad Vedpathak) यानं त्याच्या सोसायटीच्या आवारात जैन कुटुंबीयांकडून (Jain Family) मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीविरोधात (White Line Controversy) आवाज उठवला आणि त्यामुळे अख्ख्या मुंबईत (Mumbai News) पांढऱ्या पट्ट्यांचा वाद चिघळला. फक्त प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) राहत असलेल्या इमारतीतच नाहीतर, संपूर्ण घाटकोपरमध्ये (Ghatkopar) पांढऱ्या पट्ट्या असल्याचं प्रसादनं एका व्हिडीओतून दाखवून दिलं. त्यानं हा मुद्दा लावून धरल्यामुळे त्याला मोठा मनस्तापही सहन करावा लागला, पण अखेर त्याच्या सोसायटीतील पांढऱ्या पट्टीचा वाद मार्गी लागला. त्यापाठोपाठ आता शिवसेना, मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर (Dadar), शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दाही समोर आला. तसेच, ऐतिहासिक वारसा लाभलेलं आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या गिरगावच्या रस्त्यांवरही पांढऱ्या पट्ट्या झळकल्या आणि मुद्दा आणखी चिघळला. गिरगावच्या मंगलवाडीतल्या (Girgaon White Line Controversy) रस्त्यांवर झळकलेल्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे वाद आणखी चिघळला. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
घाटकोपरनंतर पांढऱ्या पट्टीचा वाद मुंबईत वाढत चाललाय. दादर इथल्या पांढऱ्या पट्टीच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर गिरगावमधील पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला असून गिरगावमधील मनसे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली. आंदोलन करणाऱ्या मनसे आणि आम्ही गिरगांवकर संघटनेच्या कार्यकर्त्यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दादरमध्ये देखील याच पांढऱ्या पट्टीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा गिरगावमधल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. गिरगावच्या मंगलवाडीतील एका सोसायटीमध्ये पांढरी पट्टी आखली जात होती, तेवढ्यात काही मराठी नागरिकांनी तिथे धाव घेत, जाब विचारला याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
गिरगावच्या मंगलवाडीत नेमकं घडलं काय? (Girgaon White Line Controversy)
गिरगावच्या मंगलवाडीत पांढऱ्या पट्ट्याबाबतचा वाद आणखी चिघळला. मंगलवाडीत रस्त्यावर पांढरी पट्टी मारली जात होती. या प्रकारानं स्थानिक संतापले आणि तात्काळ त्यांनी तिथे धाव घेत संबंधित जैन व्यक्तीला जाब विचारला. ज्या जैन व्यक्तीनं पांढरी पट्टी मारायला सांगितलेलं, त्या व्यक्तीलाच नागरिकांनी धारेवर धरलं. तुम्ही ही पांढरी पट्टी का मारली? तुम्हाला वाद निर्माण करायचाय का? मुद्दाम तुम्ही दोन समाजात भांडणं लावून तेढ निर्माण का करताय? तुम्हाला कुणी करायला सांगितलंय हे? अशी प्रश्नांची सरबत्तीची संबंधित जैन व्यक्तीवर केली. त्यावर पांढरी पट्टी मारणाऱ्या जैन व्यक्तीनं मी नाही करणार आता, तात्काळ काम थांबवतो, असं म्हटलं.
त्यावर संबंधित जैन व्यक्तीला विचारलं गेलं की, अख्ख्या मुंबई भरात काय सुरूये, तुम्हाला माहीत नाही का? त्यावर त्या व्यक्तीनं घाबरुन मला खरंच काहीही माहीत नाही, असं सांगितलं. तसेच, आम्ही इथले जुने रहिवाशी आहोत, आमच्या चार पिढ्या इथे राहतायत, असंही त्या व्यक्तीनं सांगितलं. तसेच, आम्हाला भांडण करायचं नाही, मी ही पट्टी काढून टाकतो, असंही त्या व्यक्तीनं म्हटलं. संबंधित व्यक्तीनं स्वतःचं नावंही सांगितलं. त्यावर स्थानिकांनी संबंधित जैन व्यक्तीवर स्थानिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तसेच, आम्ही ही नाटकं सहन करणार नाही, नाहीतर आम्ही आंदोलन करणार, हंगामा करणार असा अल्टीमेटमही दिलाय.
पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका काय? (What Is White Line Controversy)
प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्याची माहिती समोर आली. त्यावर प्रसादने प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी सोसायटीतील सदस्यांची परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावा त्याने केला आहे. प्रसादच्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी आखण्यात आली आहे. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी कराव्यात सार्वजनिक ठिकाणी असं प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवला होता. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही त्याने केली होती. अखेर, प्रसादने ट्विटवरुन घटनेची माहिती देत, पांढऱ्या पट्ट्यांवर रंगकाम सुरू करण्यात आल्याचं सांगितलेलं, त्यानं फोटोही शेअर केलेला. तसेच, माध्यमांनी दखल घेतल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केलेले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष