मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेतील आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक्सवर एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. मुंबईतील साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेबाबतची मिलिंद नार्वेकर यांची ती पोस्ट आहे. मॅनहोल दुर्घटना संतापजनक असून दोषी असलेल्या स्थानिक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. या दुर्घटनेसाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरलं जाण कितपत योग्य आहे, असा सवाल मिलिंद नार्वेकर यांनी केला आहे.
मिलिंद नार्वेकर काय म्हणाले?
मॅनहोल दुर्घटना ही नक्कीच संतापजनक असून दोषी स्थानिक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. परंतु, या दुर्घटनेसाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनाच जबाबदार धरले जाणे कितपत योग्य आहे? स्थानिक स्तरावरील हलगर्जीपणा आधी तपासला गेला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे, अशी पोस्ट आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे. विशेष बाब म्हणजे नार्वेकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.
मॅनहोल दुर्घटना ही नक्कीच संतापजनक असून दोषी स्थानिक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. परंतु, या दुर्घटनेसाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनाच जबाबदार धरले जाणे कितपत योग्य आहे? स्थानिक स्तरावरील हलगर्जीपणा आधी तपासला गेला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे.@Dev_Fadnavis https://t.co/4KyvpSCLu7
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) July 2, 2026
साकीनाका घटनेला आयुक्त देखील जबाबदार : संजय घाडी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि उपमहापौर संजय घाडी यांनी मॅनहोल दुर्घटनेला महापालिका आयुक्त जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. मी स्वत: उपमहापौर आणि मुंबईचा नागरिक या नात्यानं आयुक्तांना पत्र दिलं होतं. आपण या सर्व मॅनहोलची तपासणी करायला अधिकाऱ्यांना सांगावं, जिथं संरक्षित जाळ्या नसतील तिथं संरक्षित जाळ्या आपल्याला लावायला पाहिजेत, अशी लेखी मागणी केली होती. आयुक्तांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही, त्यांनी तातडीनं काम करायला पाहिजे होतं, याला आयुक्त देखील जबाबदार आहेत, असं उपमहापौर संजय घाडी यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं होतं. या घटनेसंदर्भात प्रशासनाला जाब विचारला जाईल असेल, असं घाडी यांनी म्हटलं.
मुंबई महापालिका आयुक्तांच्या राजीनाम्यांची मागणी मीडियाच्या माध्यमातून केलेली होती. साकीनाका येथील घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्याचं संजय घाडी यांनी म्हटलं. मुंबईकरांचा मृत्यू यापुढे होऊ नये यासाठी परमेश्वराला आणि आयुक्तांना विनंती करतो, असं संजय घाडी म्हणाले आहेत.
अस्लम शेख यांचा मृत्यू
मुंबईतील साकीनाका येथील खैरानी येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख या व्यक्तीचा मृत्यू झाला. रस्त्यावरुन जात असताना अस्लम शेख मॅनहोलमध्ये पडले. पावणे अकराच्या सुमारास ते मॅनहोलमध्ये पडले. जवळपास दोन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी