Ketan Agrawal Death : “माझा मुलगा निर्दोष, त्याला बळजबरीने…”; केतन अग्रवाल प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांचा खळबळजनक दावा


पुणे: लोहगड किल्ल्यावरून तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या (Ketan Agrawal Death) केल्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना अटक केली आहे. या हायप्रोफाइल मर्डर केसमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली असतानाच, आता आरोपी चेतन चौधरी याचे वडील बाबूलाल चौधरी यांनी माध्यमांसमोर येत आपल्या मुलाची बाजू मांडली आहे. “चेतनचा या हत्येशी काहीही संबंध नाही, त्याला या प्रकरणात बळजबरीने गोवण्यात आले आहे,” असा दावा त्यांनी केला आहे.(Ketan Agrawal Death)

Ketan Agrawal Death :  “सिया कोण आहे, आम्हाला माहीतच नव्हतं!”

चेतनचे वडील बाबूलाल चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांच्या कुटुंबाचा सिया गोयल नावाच्या मुलीशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नव्हता. “सिया आणि चेतन यांच्यात मैत्री होती किंवा ते एकमेकांसोबत फिरत होते, हे आम्हाला आता पोलिसांनी अटक केल्यानंतर समजले. आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आजपर्यंत त्या दोघांना एकत्र पाहिलेले नाही. १८ जून रोजी चेतन लोहगड किल्ल्यावर गेला होता, याची पुसटशी कल्पनाही आम्हाला नव्हती. घरातून निघताना त्याने फक्त एका मीटिंगला जात असल्याचे सांगितले होते,” असे बाबूलाल चौधरी यांनी स्पष्ट केले.(Ketan Agrawal Death)

Ketan Agrawal Death :  “पोलीस स्टेशनमध्ये चेतन म्हणाला, मला बळजबरीने बोलायला लावलं!”

चेतनला जेव्हा पोलिसांनी घरून ताब्यात घेतले, तेव्हाच या प्रकरणाचे गांभीर्य समजल्याचे वडिलांनी सांगितले. पोलीस स्टेशनमधील भेटीचा संदर्भ देत ते म्हणाले, “जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तेव्हा चेतन मला स्पष्टपणे म्हणाला की, ‘माझा या घटनेशी काहीही संबंध नाही. मी तिथे हजर होतो, हे मला बळजबरीने कबूल करायला लावले आहे.’ तो तिथे प्रत्यक्षात हजर होता की नव्हता, हे आम्हाला ठाऊक नाही. तिथे गेल्याचे काही पुरावे पोलीस दाखवत आहेत, पण त्याने आम्हाला काहीही सांगितले नव्हते. चेतनवर यापूर्वी कोणताही आरोप किंवा पोलीस केस नाही.”

वडिलांच्या दाव्यानुसार, चेतनने त्यांना सांगितले होते की, घटनेच्या वेळी तो मुख्य स्पॉटपासून काही अंतरावर उभा होता आणि केतन दरीत कोसळला तेव्हा सिया त्याच्या (केतनच्या) अगदी जवळ उभी होती. पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण किरकोळ असल्याचे सांगितले होते, असाही आरोप त्यांनी केला.

Ketan Agrawal Death : “चेतन अत्यंत सज्जन मुलगा”; काकांचाही दावा

या प्रकरणावर चेतनच्या काकांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, “चेतनचा या संपूर्ण प्रकरणात कोणताही रोल नाही. तो अतिशय सज्जन आणि सरळ स्वभावाचा मुलगा आहे. तो मार्केटयार्ड येथे वडिलांच्या ड्रायफ्रूट्स आणि किराणा दुकानाचे काम प्रामाणिकपणे पाहायचा.” मिळालेल्या माहितीनुसार चेतन हा एक उत्तम क्रिकेटर असून त्याचे रणजी खेळण्याचे स्वप्न होते.

एकीकडे पुणे ग्रामीण पोलीस तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही आणि कॉल डिटेल्सच्या आधारे सिया आणि चेतनने कॅफेमध्ये बसून हत्येचा कट रचल्याचा दावा करत आहेत; तर दुसरीकडे चेतनच्या कुटुंबीयांनी त्याला निर्दोष घोषित केल्यामुळे या प्रकरणातील कायदेशीर लढाई आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या मर्डर मिस्ट्रीचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *