Kailas Patil Meet Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील 6 खासदार बंड (Rebellion) करून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे देखील नाव आघाडीवर आहे. तर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात 20 वर्षांनी कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर कमालीचे चर्चेत आले आहेत. या निकालानंतर ओमराजे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण घडामोडींदरम्यान, काल मध्यरात्री ठाकरेंचे दोन विश्वासू शिलेदार ओमराजेंच्या पुण्याच्या निवासस्थानी पोहोचले होते.
काल मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांची पुण्यात भेट घेतली. या नेत्यांमध्ये मध्यरात्री सुमारे एक तास बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, ही राजकीय भेट नसून “मित्र म्हणून विचारपूस करण्यासाठी” आपण भेटलो, असे दोन्ही आमदारांनी स्पष्ट केले.
Kailas Patil Meet Omraje Nimbalkar: आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया
ओमराजे निंबाळकर यांचे ‘जिगरी यार’ म्हणून ओळखले जाणारे आमदार कैलास पाटील यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. ओमराजेंनी ज्या गोष्टीसाठी वीस वर्षे संघर्ष केला, त्यात त्यांना न्याय मिळाला नाही तो पण विषय आहे आणि सन्माननीय पक्षप्रमुखांचा जो काही निरोप होता तो घेऊन आम्ही त्यांच्याकडे आलो होतो,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
Kailas Patil Meet Omraje Nimbalkar: ‘ओमराजे सोबत राहतील’
ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यात तुम्हाला यश मिळेल का? असा प्रश्न विचारला असता, कैलास पाटील म्हणाले की, “आम्हाला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्यांची जी भावना आहे ती कालही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्या देखील तीच राहील असे आम्हाला वाटते आणि ते पक्षासोबत राहतील असा आम्हाला विश्वास वाटतो.”
त्याचसोबत, ओमराजेंनी तातडीने कोणताही निर्णय न घेता, विचार करण्यासाठी वेळ मागितल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. ओमराजेंनी “मी सांगतो, एखादा दिवस मला द्या” असे सांगितल्याची माहिती कैलास पाटील यांनी दिली. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकर शिंदे गटासोबतच, शिवसेनेच्या उच्चपदस्थ वर्तुळाला विश्वास
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतच राहणार असल्याचा विश्वास शिंदे गटाच्या वरिष्ठ वर्तुळातून व्यक्त करण्यात आला आहे. ओमराजे निंबाळकर यांचा पक्षाबाबतचा निर्णय ठाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकांशी चर्चा करणार असल्याची भूमिका निंबाळकर यांनी मांडली आहे. दरम्यान, शिवसेना नेतृत्व आणि केंद्र सरकार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत असल्याचेही पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे.
आणखी वाचा
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे