India vs Pakistan T20 World Cup 2026 : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेची वादळी सुरुवात करत पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर वर्चस्व सिद्ध केले. मात्र या सामन्याआधी घडलेल्या एका घटनेने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सामन्यादरम्यान भारताने पाकिस्तानविरुद्ध आपली ‘नो हँडशेक’ (हात न मिळवण्याची) भूमिका कायम ठेवली. तरीही सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर दिसलेले एक दृश्य अनेकांना आश्चर्यचकित करून गेले.
ट्रॉफीसोबत एकाच मंचावर मिताली अन् सना
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी विश्वचषकाची ट्रॉफी मैदानावर आणण्यासाठी आयसीसीने भारताच्या माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राज यांची निवड केली होती. तर पाकिस्तानकडून ही जबाबदारी माजी कर्णधार सना मीर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मिताली राज आणि सना मीर यांनी एकत्रितपणे विश्वचषकाची ट्रॉफी मैदानावर आणली. त्यानंतर दोघींचे ट्रॉफीसह फोटोसेशनही झाले. या छायाचित्रांमध्ये दोघी एकाच मंचावर, एकत्र उभ्या असल्याचे दिसले. भारत-पाकिस्तान सामन्यांतील तणावपूर्ण वातावरण पाहता हे दृश्य अनेकांसाठी अनपेक्षित होते.
‘नो हँडशेक’ धोरण अन् निर्माण झालेले प्रश्न
भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये प्रत्येक हालचालीवर चाहत्यांची आणि माध्यमांची बारकाईने नजर असते. अशा परिस्थितीत भारतीय संघ मैदानावर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळत असताना, दुसरीकडे मिताली राज यांनी सना मीर यांच्यासोबत ट्रॉफी अनावरण कार्यक्रमात सहभाग घेतल्याने काही प्रश्न उपस्थित झाले.
पण, ट्रॉफी सादरीकरण हा आयसीसीच्या अधिकृत कार्यक्रमाचा भाग होता. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या माजी खेळाडूंची निवड आयसीसीकडून केली जाते. त्यामुळे हा प्रसंग खेळाडूंमधील वैयक्तिक संबंध किंवा संघाच्या धोरणाशी थेट जोडून पाहता येणार नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर झाला राडा
गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रीडा संबंधांवर परिणाम झाला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी मैदानावर हस्तांदोलन न करण्याची भूमिका स्वीकारली. सर्वप्रथम ही बाब पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेत पाहायला मिळाली. त्यानंतर पुरुषांच्या टी-20 विश्वचषकातही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन टाळले होते. यावेळी महिला क्रिकेट संघानेही तीच भूमिका कायम ठेवली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हात न मिळवण्याचा निर्णय कायम ठेवला.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला