Deepti Sharma Statement Ind vs Pak Womens T20 World Cup 2026 : महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्याच हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी अक्षरशः धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयाची सर्वात हिरो भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा ठरली. दीप्तीच्या फिरकीच्या जादुई स्पेलसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. या सामन्यानंतर दीप्तीने केलेल्या एका वक्तव्याने सध्या क्रीडा जगतासह सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे.
‘तो’ एक खुलासा अन् सोशल मीडियावर चर्चांना उधाण! (Deepti Sharma Statement on Ind vs Pak)
पाकिस्तानचा निम्मा संघ एकहाती पॅव्हेलियनमध्ये धाडल्यानंतर दीप्ती शर्माला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ (सामनावीर) पुरस्काराने गौरवण्यात आले. मैदाना सादरीकरण करताना जेव्हा तिला या अद्भूत कामगिरीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने दिलेले उत्तर चाहत्यांचे मन जिंकून गेले. दीप्ती म्हणाली, “या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या संघाला जाते. मला खूप आनंद होत आहे. ‘हनुमानजी महान आहेत’.” दीप्तीने विजयानंतर थेट हनुमानजींचे आभार मानल्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या श्रद्धेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान मोदींसोबतचा तो किस्सा पुन्हा चर्चेत (Deepti Sharma Statement on Ind vs Pak)
दीप्ती शर्माची संकटमोचक हनुमानजींवर श्रद्धा आहे, हे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. 2025 मध्ये जेव्हा भारतीय महिला संघाने एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) जिंकून इतिहास रचला होता, त्यानंतर संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान, पीएम मोदींचे लक्ष दीप्तीच्या हातावरील एका टॅटूकडे गेले होते, जो हनुमानजींचा होता. मोदींनी त्या टॅटूबद्दल विचारणा केली असता दीप्तीने अत्यंत भावुक होऊन सांगितले होते की, “जेव्हा जेव्हा मी मैदानावर किंवा आयुष्यात कठीण प्रसंगातून जात असते, किंवा प्रचंड दबावाचा क्षण असतो, तेव्हा मी फक्त हनुमानजींचे स्मरण करते. तिथूनच मला लढण्याची प्रेरणा आणि प्रचंड मानसिक बळ मिळते.”
10 धावा, 5 विकेट्स अन् पाकिस्तानचा गेम ओव्हर! (Deepti Sharma Ind vs Pak T20 World Cup 2026)
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाकिस्तानसमोर 171 धावांचे मजबूत आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातच अत्यंत खराब झाली. पाकिस्तानला पहिला मोठा धक्का दीप्ती शर्मानेच दिला. त्यानंतर दीप्तीच्या फिरकीचे असे वादळ आले की पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. दीप्तीने तिच्या 4 षटकांच्या कोट्यात अवघ्या 10 धावा देऊन 5 विकेट घेतले आणि पाकिस्तानची कंबरच तोडली.
एकच सामना अन् दोन मोठे जागतिक विक्रम!
पाकिस्तानविरुद्धच्या या भेदक कामगिरीसह दीप्तीने क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात 5 विकेट्स घेणारी ती भारताची केवळ तिसरी गोलंदाज ठरली आहे. यापूर्वी रेणुका सिंग ठाकूर आणि प्रियांका रॉय यांनी हा पराक्रम केला होता. या 5 विकेट्ससह दीप्ती शर्मा आता महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी जगातील नंबर 1 गोलंदाज बनली आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला