IND vs AFG One-off Test Auqib Nabi News : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकमेव कसोटी सामन्यासाठी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी डारला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने क्रिकेट वर्तुळात वाद निर्माण झाला होता. देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या या खेळाडूला डावलल्यामुळे निवड समितीवर जोरदार टीका झाली. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या संपूर्ण प्रकरणात एक नवा ट्विस्ट आणला आहे.
आकिब नबी डारचा अधिकृत 15 सदस्यांच्या संघात समावेश करण्यात आलेला नसला, तरी त्याला ‘बॅक-अप’ (राखीव) खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत जोडण्यात आले आहे. 6 ते 10 जून दरम्यान मुल्लानपूर येथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात हा सामना खेळवला जाणार आहे. मुख्य संघात नसला तरी अकिब आता राष्ट्रीय संघासोबतच राहून सराव करेल.
आकिब नबी डारची वादळी कामगिरी (Auqib Nabi IND vs AFG One-off Test)
24 वर्षीय आकिब नबीने यंदाचा रणजी करंडक हंगाम अक्षरशः गाजवला होता. त्याने अवघ्या 12.57 च्या सरासरीने तब्बल 60 विकेट्स घेत प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब पटकावला. कर्नाटकविरुद्धच्या रणजी अंतिम सामन्यात त्याने केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि करुण नायर यांसारख्या दिग्गज भारतीय खेळाडूंना बाद करत 5 बळी घेतले होते. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर जम्मू-काश्मीरने कर्नाटकला पराभवाचा धक्का दिला होता. इतकी उत्कृष्ट कामगिरी करूनही त्याला सुरुवातीला संघात न घेतल्याने चाहत्यांनी आणि तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली होती.
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर याने नबीच्या निवडीवर स्पष्टीकरण देताना म्हटले की, “गेल्या दोन हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या नावावर नेहमीच चर्चा होते. पण जेव्हा आपण भारतात खेळतो, तेव्हा संघात जास्त वेगवान गोलंदाजांना स्थान देणे कठीण असते.”
आकिब नबी आयपीएल अपयश, गुरनूर ब्रारची निवड (Auqib Nabi IND vs AFG One-off Test)
आकिब नबीच्या समर्थकांनी त्याच्या लाल चेंडूच्या (Red-ball) कामगिरीचा दाखला दिला असला, तरी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये त्याला अपयश आले होते. 5 सामन्यांत त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. निवड समितीने आकिबऐवजी पंजाबच्या गुरनूर ब्रारला संघात स्थान दिले, ज्याने रणजीच्या 7 सामन्यांत 21.26 च्या सरासरीने 23 बळी घेतले होते. ब्रारची कामगिरी चांगली असली, तरी आकिबच्या 60 बळींच्या विक्रमासमोर ती फिकी वाटत असल्याने हा वाद अधिक वाढला.
हे ही वाचा –
आणखी वाचा