सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील सिद्धनाथाच्या यात्रेवरुन परत येत असतना पिकअप गाडी विहिरीत कोसळली आणि हा अपघात झाला आहे. भरधाव पिकअप थेट विहिरीत गेली आणि या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृत्यू झाला ते सर्व जण पंढरपूरच्या रांजणी गावातील आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या अपघाताबाबत माहिती घेत असल्याचं सांगण्यात आलं. तर, आंदोलनं करुन देखील रस्त्यांच्या कामांबाबत प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचं देखील ते म्हणाले.
धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले?
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अपघातासंदर्भात माहिती दिली आहे. ही बातमी समजली असून स्थानिक नागरिकांकडून मदत कार्य सुरु आहे. जखमींना दवाखान्यात नेण्यात आल्याचं मोहिते पाटील यांनी म्हटलं. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे स्पॉट आहेत, अर्धवट कामं राहिली आहेत. चार चार वर्ष कामं पूर्ण झाली नाहीत. बैठका घेतल्या तरी प्रगती नाही, असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं. रस्ता सुरक्षा उपाययोजना कोणत्याही प्रकारच्या करण्यात आल्या नव्हत्या. दर महिन्याला अपघात होतो, वारंवार पत्रव्यवहार करुन शासनाकडून दुर्लक्ष केलं जातं. मंत्र्यांकडे, अधिकाऱ्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे फॉलोअप घेऊन ही कोणालाच फरक पडत नाही. फक्त बैठका लावल्या जातात. कंत्राटदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं.
माळशिरसमधील तांदुळवाडीतील या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाची यंत्रणा देखील बोलावण्यात आली होती. विहिरीतून पिकअप बाहेर काढण्यात आली असून 6 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर, 8 जणांचा मृत्यू झाला.
सातारा पंढरपूर रस्त्यावर माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाच्या हद्दीतील विहिरीत पिकअप कोसळली. देवदर्शनावरुन परत येत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं या विहिरीत पिकअप कोसळली आहे. अपघातात ज्यांचा मृत्यू झाला ते सर्व जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील आहेत. सर्वच 8 जण पंढरपूरच्या रांजणी गावातील आहेत. विहिरीतून क्रेनद्वारे पिकअप बाहेर काढण्यात आली.
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप