Solapur Accident: खुदा का फरिश्ता… चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला


सोलापूर: जिल्ह्यातील म्हसवड (Solapur) येथून सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा पिकअप टेम्पो रस्त्याकडे असलेल्या धोकादायक विहिरीत पडल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. ही दुर्घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. सातारा-सोलापूर रोडवरील तांदूळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरीचा अंदाज न आल्याने हा टेम्पो थेट या विहिरीत कोसळल्याने ही दुर्घटना (Accident) घडली. तांदूळवाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विहिरीजवळून जात असताना गाडीवरील ताबा सुटला आणि हा मिनी टेम्पो थेट विहिरीत कोसळला. सुदैवाने या गाडीच्या मागेच तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण दुचाकीवरून येत होता. हा टेम्पो पाण्यात पडल्याचे पाहून त्याने तातडीने गावात मदतीसाठी फोन केले. याचवेळी एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचे पाहून तात्काळ इरफानने पाण्यात उडी घेतली आणि या चिमूरड्याला छातीशी धरून त्याच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. 

सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरवणाऱ्या घटनेनं मन हेलावून गेलं आहे, माळशिरसमध्ये घडलेल्या अपघातात एकाच गावातील 8 जणांचा मृत्यू झाला. मात्र, ग्रामस्थांच्या मदतीने, आणि पिकअपच्या पाठीमागून दुचाकीवर येणाऱ्या इराफानने दाखवलेल्या धाडसाने 5 जणांचा जीव वाचला. पाण्यात हालचाल दिसल्यावर आधी दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांनाही इरफानने ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. इरफानने पाच जणांचे जीव वाचवले तर दोन पुरुष पोहून बाहेर आले. मात्र, हा टेम्पो विहिरीत खाली उलट्या बाजूने पडल्याने टेम्पोच्या आतमध्ये असणाऱ्या सात महिला आणि एक सहा महिन्याच्या बाळाला मात्र वाचविण्यात अपयश आल्याची खंत इरफानने बोलून दाखवली. वेळ काळ बनून आली होती. मात्र, इरफान देवदूत बनून आला अन् 5 जणांच्या जीवाचे रक्षण करणारा खुदा का फरिश्ता ठरला. 

दरम्यान, यात ज्यांचे प्राण वाचवले त्या सर्वांना तातडीने पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिके एन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे घटनास्थळी दाखल झाले असून पालकमंत्री जयकुमार गोरेही अपघाताच्या ठिकाणाकडे निघाले आहेत. 

भूसंपादनावेळी धोकादायक विहिरी तशाच सोडल्या

या अपघाताची कसून चौकशी केली जाणार असून ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची ही माहिती घेऊन यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिला आहे. वास्तविक या रस्त्याचे काम सुरू असताना अशा धोकादायक विहिरींबाबत सुरक्षेचे नियम पाळणे गरजेचे असताना या ठिकाणी कोणतीही सुरक्षा कठडे देखील नसल्याचे दिसून आले. या विहिरींचे अधिग्रहण करणे गरजेचे असताना रस्त्याचे काम सुरू झाल्यावर या धोकादायक विहिरी अशाच सोडल्या आणि दुसऱ्या बाजूच्या जागांचे भूसंपादन करण्यात आल्याच्या तक्रारी आज ग्रामस्थांनी केल्या आहेत.

हेही वाचा

दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात ‘हॉटस्पॉट’वर सरकार लक्ष देणार का?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *