India vs Afghanistan 3rd ODI : चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात एक रंजक घटना पाहायला मिळाली. भारतीय संघाला अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 219 धावांचा पाठलाग सुरू करण्यापूर्वीच 5 धावांची पेनल्टी (Penalty Runs) बहाल करण्यात आली. त्यामुळे टीम इंडियाचा डाव पहिल्या चेंडू आधीच 5 धावसंख्येने सुरू झाला.
भारताला 5 धावा का मिळाल्या? नियम काय सांगतो?
अफगाणिस्तानच्या डावातील 40 व्या षटकात ही घटना घडली. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी फलंदाजी करताना खेळपट्टीच्या मध्यभागी असलेल्या सुरक्षित किंवा प्रतिबंधित क्षेत्रावरून धावत होता. या भागातून वारंवार धावल्यास खेळपट्टी खराब होऊ शकते, ज्याचा फायदा गोलंदाजांना मिळू शकतो. आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार, पंचांनी हशमतुल्ला शाहिदीला आधीच एकदा अधिकृतपणे ताकीद दिली होती. ताकीद देऊनही शाहिदीने पुन्हा तीच चूक केली. त्यामुळे पंचांनी शिस्तभंगाची कारवाई करत अफगाणिस्तान संघाला 5 धावांची पेनल्टी ठोठावली आणि या 5 धावा भारताच्या खात्यात जमा झाल्या.
भारतासाठी समीकरण झाले सोपे
कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने भारतासमोर 219 धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 44.2 षटकांत 218 धावा केल्या. या सामन्यात शाहिदीने अफगाणिस्तानसाठी शतक झळकावले, तर अझमतुल्ला ओमरझाईने अर्धशतक झळकावले. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज लक्षणीय योगदान देऊ शकला नाही, ज्यामुळे संघ 50 षटकांच्या आतच सर्वबाद झाला.
आधी फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली आणि 36 धावांतच त्यांचे चार गडी बाद झाले. त्यानंतर शाहिदीने ओमरझाईसोबत भागीदारी केली आणि या दोन फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी 105 धावा जोडल्या. प्रिन्स यादवने ओमरझाईला 50 धावांवर बाद करून ही भागीदारी तोडली. शाहिदीने आपले पहिले एकदिवसीय शतक झळकावले. तो 131 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि एका षटकारासह 102 धावा करून बाद झाला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने उत्कृष्ट कामगिरी करत पाच बळी घेतले, तर गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
Bonus runs for Team India! 🙌🇮🇳
The Men in Blue will begin the chase on 5/0 after Afghanistan were handed a five-run penalty. Hashmatullah Shahidi ran on the pitch for the third time, resulting in the run taken being disallowed and five penalty runs being awarded to India. 👀… pic.twitter.com/2dLnVccO6N
— Sportskeeda (@Sportskeeda) June 20, 2026
टीम इंडियाच्या डावाची वादळी सुरुवात…
भारताने डावाची सुरुवात अत्यंत धडाकेबाज पद्धतीने केली. अफगाणिस्तानच्या अझमतुल्ला ओमरझाईने टाकलेल्या पहिल्याच षटकात तब्बल 23 धावा वसूल करण्यात आल्या. ज्यात पेनल्टीच्या 5 धावांचाही समावेश होता. यशस्वी जैस्वाल 14 धावांवर खेळत आहे, तर रोहित शर्माने अद्याप चेंडू खेळलेला नाही.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला