देशातील सराफा बाजारात गुरुवारी (16 जुलै) सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. बहुतांश प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर वाढले असून, दुसरीकडे चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. 16 जुलै रोजी सकाळी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,43,730 रुपयांवर पोहोचला. मुंबई आणि कोलकाता येथे हा दर 1,43,580 रुपये, तर चेन्नईमध्ये 1,43,790 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवण्यात आला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 4,029.66 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. एका दिवसापूर्वीच दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धत असलेलं सोनं 1,46,300 रुपये किमतीला होतं.
देशातील प्रमुख शहरांतील सोन्याची किंमत
दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,730 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,31,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबई, कोलकाता, पुणे आणि बेंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,580 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,31,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,43,790 रुपये, तर 22 कॅरेटचा भाव 1,31,810 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
दरम्यान, जागतिक वित्तीय संस्था HSBC ने सोन्याबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. संस्थेच्या मते, 2026 मध्ये सोन्याची सरासरी किंमत 4,560 डॉलर प्रति औंस राहू शकते. 2027 मध्ये ती 4,925 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, यावर्षाअखेरीस सोन्याचा दर 4,750 डॉलर आणि पुढील वर्षाच्या अखेरीस 5,025 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो.
सोनं वाढलं, पण चांदीचं काय ?
एकीकडे सोन्याचे दर वाढलेत, पण चांदीच्या किमतीत मात्र घसरण झाली आहे. 16 जुलै रोजी सकाळी चांदीचा भाव 2,34,900 रुपये प्रति किलोवर आला. दागिने विक्रेते आणि औद्योगिक क्षेत्राकडून मागणी कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरांवर दबाव दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरची किंमत 58.26 डॉलर प्रति औंस इतकी आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतातील सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत मागणी, रुपयाची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा एकत्रित परिणाम होत असतो.