पुणे: पोलीस ठाण्यातच हाय-व्होल्टेज ड्रामा! तो बॅग घेऊन आला अन् हातात देणार इतक्यात… ‘त्या’ महिला PSI ला रंगेहात पकडलं | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

तक्रार मिळताच ‘एसीबी’च्या पथकाने दिघी पोलीस ठाण्यातच सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेचा पहिला हप्ता म्हणून ३ लाख रुपये घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला

महिला पोलिसाला रंगेहात पकडलं (प्रतिकात्मक फोटो)
महिला पोलिसाला रंगेहात पकडलं (प्रतिकात्मक फोटो)

पिंपरी: पिंपरी-चिंचवड परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलाला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दाखल गुन्ह्याचा अंतिम अहवाल देण्यासाठी तब्बल ८ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडलं. ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना झालेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव चैताली बाळासाहेब गपाट (वय ३५, रा. मांजरी) असे आहे. त्या दिघी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,दाखल गुन्ह्याचा अंतिम अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पीएसआय चैताली गपाट यांनी थेट ८ लाख रुपयांची अवाढव्य लाच मागितली होती.

तक्रारदार पुरुषाला एवढी मोठी लाचेची रक्कम देण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाऊन महिला अधिकाऱ्याविरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच ‘एसीबी’च्या पथकाने दिघी पोलीस ठाण्यातच सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेचा पहिला हप्ता म्हणून ३ लाख रुपये घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. पीएसआय चैताली गपाट यांनी लाचेची ही ३ लाखांची रक्कम हातात स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आणि ताब्यात घेतले.

आपल्याच पोलीस ठाण्यात एका महिला उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने दिघी पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले. या कारवाईनंतर पीएसआय चैताली गपाट यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

लाचखोरीच्या या मोठ्या प्रकरणामुळे खाकी वर्दी पुन्हा एकदा डागाळली असून, एका महिला अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यालाच लाचखोरीचा अड्डा बनवल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/पुणे/

पुणे: पोलीस ठाण्यातच हाय-व्होल्टेज ड्रामा! तो बॅग घेऊन आला अन् हातात देणार इतक्यात… ‘त्या’ महिला PSI ला रंगेहात पकडलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *