Box Office Collection: या आठवड्यातला बुधवार बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड चित्रपटांसाठी (Box Office Collection) धक्कादायक ठरला. सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘धमाल 4’, ‘अल्फा’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘मैं वापस आऊंगा’ हे चित्रपट प्रदर्शित आहेत. मात्र बुधवारी या चारही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गटांगळ्याच खाल्याचं चित्र होतं. कोणाच्या कमाईत 31 टक्के, तर कोणाच्या कमाईत 33 टक्क्यांपर्यंत घट झाली. तरीही ‘धमाल 4’ने (Dhamal 4) 100 कोटींचा टप्पा पार करत दमदार कामगिरी कायम ठेवली आहे.
Dhamaal 4: ab’धमाल 4’च्या कमाईत 31.6 टक्क्यांची घसरण
‘धमाल 4’ने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी 6.50 कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी चित्रपटाने 9.50 कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे एका दिवसात 31.6 टक्क्यांची घसरण झाली आहे.आतापर्यंत चित्रपटाने भारतात 89.75 कोटी रुपयांचं नेट आणि 107.11 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. चित्रपटाचं बजेट सुमारे 150 ते 200 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.परदेशात सहाव्या दिवशी चित्रपटाने 1.25 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे ओव्हरसीज कलेक्शन 17.25 कोटी रुपये, तर एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन 124.36 कोटी रुपये इतकं झालं आहे.
Alpha Box Office:’अल्फा’चा खेळ जवळपास संपला?
आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘अल्फा’ची अवस्था दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या 11व्या दिवसापासून चित्रपटाची कमाई लाखांच्या घरात आली आहे.आतापर्यंत ‘अल्फा’ने भारतात 55.80 कोटी रुपयांचं नेट आणि 66.48 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. तर जगभरातील एकूण कमाई 93.48 कोटी रुपये झाली आहे.YRF स्पाय युनिव्हर्समधील हा महिला-केंद्रित अॅक्शनपट अपेक्षित यश मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचं चित्र दिसत आहे.
Welocome To Jungle Box Office:’वेलकम टू द जंगल’चीही दमछाक
अक्षय कुमारचा मल्टिस्टारर ‘वेलकम टू द जंगल’ प्रदर्शनाच्या 20व्या दिवशी पोहोचला आहे. चित्रपटाने आपलं बजेट वसूल केलं असलं, तरी सुपरहिटचा दर्जा मिळवू शकलेला नाही.20व्या दिवशी चित्रपटाने 50 लाख रुपयांची कमाई केली. 19व्या दिवसाच्या तुलनेत ही 33.3 टक्के घसरण आहे.आतापर्यंत चित्रपटाने भारतात 131.35 कोटी रुपयांचं नेट आणि 156.07 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. तर वर्ल्डवाइड कलेक्शन 189.32 कोटी रुपये इतकं झालं आहे.
Main Vaapas Aaunga:’मैं वापस आऊंगा’ ठरला हिट
इम्तियाज अली दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिलजीत दोसांझ, नसीरुद्दीन शाह, शर्वरी वाघ आणि वेदांग रैना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने सुरुवातीला संथ गतीने कमाई केली, मात्र सकारात्मक प्रतिसादामुळे नंतर जोरदार मुसंडी मारली. आतापर्यंत चित्रपटाने भारतात 62.82 कोटी रुपयांचं नेट आणि 74.70 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. तर जगभरातील कमाई 95.65 कोटी रुपये झाली आहे.
‘द ओडिसी’मुळे वाढणार अडचणी
या चारही चित्रपटांसमोर आता सर्वात मोठं आव्हान म्हणजे ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘द ओडिसी’ हा बहुप्रतिक्षित हॉलिवूड चित्रपट. 17 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे ‘धमाल 4’, ‘अल्फा’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘मैं वापस आऊंगा’ यांच्या कमाईवर येत्या दिवसांत त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.