Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?


Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये घरवापसी होण्याच्या चर्चांना मोठे उधाण आले होते. मात्र, या चर्चांदरम्यानच खडसे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईतील ‘मातोश्री’ (Matoshree) निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हेही उपस्थित होते. त्यामुळे खडसे यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क रंगू लागले आहेत.

एकनाथ खडसे यांनी जवळपास चार दशकांहून अधिक काळ भाजप (BJP) मध्ये सक्रिय राहिल्यानंतर पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरही त्यांच्या भाजपमधील पुनरागमनाच्या चर्चा वेळोवेळी होत राहिल्या. अलीकडेच विनोद तावडे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले होते. यामुळे खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने या चर्चांना वेगळेच वळण मिळाले आहे.

Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: मातोश्रीवरील भेटीनंतर खडसेंचे स्पष्टीकरण

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी या भेटीमागील कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पुढील महिन्यात त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. याच कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. ही केवळ औपचारिक भेट होती. या भेटीचा कोणत्याही राजकीय घडामोडी किंवा पक्षप्रवेश यांच्याशी संबंध जोडणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Khadse: राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

एकीकडे भाजप प्रवेशाच्या चर्चा, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची भेट, या दोन घटनांमुळे एकनाथ खडसे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, स्वतः खडसे यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करत ही भेट केवळ निमंत्रणासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. तर, खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा कितीही जोरात असल्या, तरी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिळालेली आमदारकी सोडून ते तातडीने भाजपमध्ये जाण्याची जोखीम पत्करण्याची शक्यता खूपच कमी आहे, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Operation Tiger 3: ‘ऑपरेशन टायगर 3’ मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे ‘मतपरिवर्तन’ केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *