भिवंडी : भिवंडी शहरातील फरीद बाग परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इमारतीच्या पार्किंग परिसरात मित्रांसोबत खेळत असताना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मोहम्मद अहमद मसूद असं या मृत बालकाचं नाव आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून फरीद बाग परिसरात शोककळा पसरली आहे.
शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली होती. दुपारी वडील मसूद हे आपल्या मोठ्या मुलाला शाळेतून घरी घेऊन आले. त्यानंतर लहानगा मोहम्मद अहमद हा राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये इतर मुलांसोबत खेळण्यासाठी गेला. खेळताना तो पार्किंगमधील सेप्टिक टँकवर ठेवलेल्या पत्र्याच्या झाकणावर चढला. मात्र, हे झाकण आधीपासूनच खराब व कमकुवत अवस्थेत असल्याने अचानक आत कोसळले आणि मोहम्मद अहमद थेट सेप्टिक टँकमध्ये पडला.
Bhiwandi Incident Investigation : पोलिसांकडून पुढील तपास सुरू
घटनेनंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरडा करत घरच्यांना आणि नागरिकांना माहिती दिली. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत चिमुकल्याला बाहेर काढले आणि खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच निजामपूरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Bhiwandi Child Death Negligence Issue : इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
इमारतीच्या देखभालीकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच हा निष्पाप जीव गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या इमारतींमध्ये सुरक्षेच्या मूलभूत सुविधांकडे बिल्डर आणि सोसायटी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला गेला आहे.
ही बातमी वाचा :
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी