Last Updated:
श्रीलंका ए विरुद्धच्या सामन्यात इंडिया ए चा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला, यानंतर वैभव सूर्यवंशीने श्रीलंकन खेळाडूला धक्काबुक्की केली आहे.
मुंबई : आयपीएल 2026 मध्ये धमाका केल्यानंतर वैभव सूर्यवंशी इंडिया ए कडून ट्राय सीरिज खेळत आहे, पण श्रीलंका ए विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. श्रीलंका ए विरुद्धच्या सामन्यात इंडिया ए चा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला, यानंतर वैभव सूर्यवंशीने श्रीलंकन खेळाडूला धक्काबुक्की केली आहे. थरारक विजय मिळवल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला, हे पाहून वैभव सूर्यवंशी चांगलाच संतापला आणि त्याने श्रीलंकेच्या खेळाडूला ढकललं. याला प्रत्युत्तर म्हणून श्रीलंकन खेळाडूनेही वैभवला धक्का दिला. अखेर श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला, पण या राड्यामुळे वैभव सूर्यवंशीच्या अडचणी वाढू शकतात.
वैभव सूर्यवंशी बॅन होणार?
आयसीसीच्या नियमांनुसार, वैभव सूर्यवंशीने श्रीलंकन खेळाडूला ढकलणे हा एक मोठा गुन्हा आहे. दोषी खेळाडूला दंड आणि बंदी घातली जाऊ शकते. खेळाडूसाठी शिक्षेचे चार स्तर आहेत.
किरकोळ गैरवर्तनासाठी ताकीद दिली जाते आणि त्याच्या सामन्याचे मानधन कापले जाते. एक डिमेरिट पॉइंट देखील दिला जातो. हा लेव्हल 1 चा गुन्हा आहे.
लेव्हल 2 मध्ये खेळाडूची मॅच फी कापले जाते आणि दोन ते चार डिमेरिट पॉइंट्स दिले जातात, ज्यामुळे खेळाडूवर एक ते दोन सामन्यांची बंदी येते. ही शिक्षा जाणूनबुजून एखाद्या खेळाडूला ढकलल्याबद्दल दिली जाते.
लेव्हल 3 किंवा 4 चे गुन्हे, ज्यात खेळाडूच्या धक्क्याने प्रतिस्पर्ध्याला दुखापत होते, ते हिंसक मानले जातात आणि त्यामुळे अनेक सामन्यांची किंवा संपूर्ण सीझनची बंदी येते. पण, वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत असे घडले नाही.
तिलक वर्माचा अंपायरसोबत पंगा
श्रीलंका ए विरुद्धच्या सामन्यात, फक्त वैभव सूर्यवंशीच आक्रमक दिसला नाही; कर्णधार तिलक वर्मा देखील अंपायरसोबत वाद घालताना दिसला. सामना बरोबरीत सुटल्यानंतर तिलक वर्माने अंपायरसोबत पंगा घेतला. सामन्याची वेळ संपल्यामुळे अंपायरचा सुपर ओव्हर खेळायला नकार होता, पण तिलकला कोणत्याही परिस्थितीत सुपरओव्हर हवी होता. सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरही वाद निर्माण झाला, जेव्हा अंपायरनी अर्शद खानचा शेवटचा बॉल नो-बॉल दिला नाही, यानंतर भारतीय खेळाडू डगआऊटमध्ये गेले. पण, अंपायरनी नंतर आपला निर्णय बदलला आणि तो नो-बॉल असल्याचे घोषित केले. त्यानंतर तिलक वर्मा पुन्हा अंपायरसोबत भिडला. या वर्तनामुळे तिलक वर्मावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
इंडिया ए ला पराभवाचा धक्का
या ट्राय सीरिजमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. अफगाणिस्तान ए विरुद्धचा सामना गमावल्यानंतर इंडिया ए चा श्रीलंकेविरुद्धही पराभव झाला आहे. इंडिया ए ने 3 पैकी 2 सामने गमावले आहेत. फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर आता इंडिया ए ला अफगाणिस्तानविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावाच लागणार आहे. हा सामना 17 जूनला होणार आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 16, 2026 12:02 AM IST
