Aaditya Thackeray Slams BJP : देशातल्या तरुण आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आज आंदोलने होत आहेत. आम्ही आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. पण ही तर फक्त सुरुवात आहे; पुढे जाऊन आम्ही थेट या देशाच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत, असा आक्रमक इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिला. आम्हाला कापले तरी आम्ही भाजपसमोर कधीही झुकणार नाही, असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने मुंबईत जाहीर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवर आणि देशातील सद्यस्थितीवर जोरदार हल्लाबोल केला.
Aaditya Thackeray On Sonam Wangchuk : ‘लडाख अदानींच्या घशात घालण्यासाठी वांगचुक यांना अटक’
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले, “सोनम वांगचुक यांनी या आधीही लडाखला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने लडाखच्या जनतेला तसे आश्वासनही दिले होते. मात्र, भाजपला लडाखची जमीन उद्योगपती अदानी यांच्या घशात घालायची आहे. याच कारणामुळे सोनम वांगचुक यांना या आधी आंदोलन करावे लागलं होतं.”
Thackeray Target BJP On ISRO Constitution : ‘देश बदलायला बहुमत दिले, हे संविधान बदलत आहेत’
केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “या देशातील जनतेने भाजपला देश बदलण्यासाठी आणि विकास करण्यासाठी बहुमत दिले होते. मात्र, हे लोक आता देशाचे संविधान बदलू पाहत आहेत. इस्रोच्या (ISRO) 100 वैज्ञानिकांनी राजीनामा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे आहोत? भाजपला इस्रोसारख्या महत्त्वाच्या संस्था सांभाळता येत नाहीत, पण दुसऱ्या पक्षांचे खासदार फोडण्यात ते व्यस्त आहेत. ‘हर घर जल’, ‘स्मार्ट सिटी’, ‘प्रत्येकाला घर’ या भाजपच्या घोषणा आता कुठे गेल्या?”
Aaditya Thackeray On Abhijeet Dipke NEET : अभिजित दिपकेच्या आंदोलनाचा उल्लेख
नीट (NEET) परीक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील गोंधळावरून आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “महाराष्ट्राचा अभिजित दिपके हा तरुण मुलगा आज दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी उपोषणाला बसला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, ही त्याची प्रमुख मागणी आहे. मात्र, भाजप सरकार तरुणांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जनतेला धर्म आणि जातीच्या वादात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. जग पुढे जात असताना भाजप आपल्याला 50 वर्षांपूर्वी काय झाले, यात अडकवून नेहरू विरुद्ध सरदार पटेल असा भूतकाळातील वाद उकरून काढत आहे,” अशी टीका त्यांनी केली.
Unemployment Report India : ‘भाजपसारख्या देशद्रोही पक्षाला सत्तेबाहेर काढा’
देशातील बेरोजगारीच्या भीषण परिस्थितीवर बोट ठेवत आदित्य ठाकरे यांनी एका अहवालाचा दाखला दिला. “पुढच्या 10 वर्षांत देशात 120 कोटी तरुणांना नोकऱ्यांची गरज असेल, मात्र केवळ 40 कोटी तरुणांनाच नोकऱ्या मिळतील अशी स्थिती आहे. भाजपच्या नेत्यांची मुले परदेशात शिकायला आणि स्थायिक व्हायला जातील; मग आपल्या सर्वसामान्य तरुणांनी कुठे जायचे? हे सरकार राम मंदिर आणि पंढरपूर लुटण्याचे काम करत आहे. त्यामुळे या भाजपसारख्या देशद्रोही पक्षाला सत्तेबाहेर काढले पाहिजे. आता देशात एकच नारा लागला पाहिजे. आधी शिक्षण मंत्री प्रधानांचा राजीनामा आणि नंतर थेट प्रधानमंत्र्यांचा राजीनामा,” असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.
ही बातमी वाचा:
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम