श्रेयस तळपदेच्या ‘मर्दिनी’ला हिंदीत मोठी मागणी, तरीही अभिनेत्याने मराठीतच का बनवली फिल्म? कारण देत केला बॉलिवूडचा पर्दाफाश | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

अनेकदा मराठीतील तगड्या कलाकारांना हिंदीत दुय्यम भूमिका दिल्या जातात, तर कधी उत्कृष्ट कथाही नाकारल्या जातात. याच भेदभावावर मराठीचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे याने तीव्र शब्दांत खंत व्यक्त केली आहे.

News18
News18

मुंबई: आजचा काळ हा प्रादेशिक सिनेमांचा आहे, यात वादच नाही. हिंदी बॉक्स ऑफिसला घाम फोडण्याची ताकद आता मराठी चित्रपटांमध्ये निर्माण झाली आहे. अलिकडच्या काळात ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’, ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद २’ आणि ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या दर्जेदार मराठी चित्रपटांनी थिएटर्स हाऊसफुल्ल करून हे सिद्धही केले आहे. परंतु, इतके सगळे होऊनही बॉलिवूडमधील काही मंडळी आजही मराठी सिनेसृष्टीला अत्यंत हलक्यात घेतात.

अनेकदा मराठीतील तगड्या कलाकारांना हिंदीत दुय्यम भूमिका दिल्या जातात, तर कधी उत्कृष्ट कथा “हा विषय फक्त मराठीतच चालेल” म्हणून नाकारल्या जातात. याच भेदभावावर मराठीचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे याने तीव्र शब्दांत खंत व्यक्त केली आहे.

श्रेयस तळपदेने केला बॉलिवूडचा पर्दाफाश

श्रेयस तळपदेने त्याच्या आगामी ‘मर्दिनी’ या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमधील एका मोठ्या मानसिकतेचा पर्दाफाश केला. श्रेयस म्हणाला, “जेव्हा आम्ही ‘मर्दिनी’ची कथा फायनल केली, तेव्हा हिंदीतील अनेक बड्या लोकांनी ती ऐकली. कथा ऐकताच ते थक्क झाले आणि म्हणाले, ‘क्या सब्जेक्ट है भाई, ये तो हिंदी मे होना चाहिये.’ जेव्हा मी त्यांना सांगितले की मी हा सिनेमा मराठीत बनवणार आहे, तेव्हा त्यांनी मला सल्ला दिला की जर तू हा चित्रपट मराठीत केलास तर तो एका मर्यादित प्रेक्षकांपर्यंतच राहून जाईल. हा पॅन इंडिया विषय आहे, त्यामुळे तो हिंदीतच करायला हवा.”

श्रेयसचा ठाम नकार

बॉलिवूडमधील मंडळींच्या या सल्ल्यावर श्रेयस अजिबात डगमगला नाही. त्याने मेकर्सना स्पष्ट शब्दांत नकार देत ‘मर्दिनी’ फक्त आणि फक्त मराठीतच बनवण्याचा विडा उचलला. आपल्या या जिद्दीमागचे कारण सांगताना श्रेयस भावुक होऊन म्हणाला, “माझी अभिनय कारकीर्द मराठी मातीतून सुरू झाली आहे. या चित्रपटाचा विषयही मला महाराष्ट्रातूनच मिळाला आहे, मग मी तो हिंदीत का घेऊन जाऊ?”

श्रेयस पुढे म्हणाला, “जर चांगल्या आणि दर्जेदार कथा आपणच हिंदीला देऊन टाकल्या, तर आपली मराठी इंडस्ट्री कशी वाढणार? आपल्या मराठी प्रेक्षकांनाही उत्तम, मसालेदार आणि तितकाच मनोरंजक आशय मिळायला हवा. तुम्ही जर प्रत्येक वेळी मराठीला कमी लेखणार असाल, तर आमच्या प्रादेशिक कलाकारांना पुढे जाण्याची संधी कशी मिळणार?” श्रेयसच्या या रोखठोक भूमिकेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

एक भित्री आई जेव्हा बनते ‘मर्दिनी’…

श्रेयस तळपदेची निर्मिती असलेल्या ‘मर्दिनी’ या चित्रपटाची कथा एका आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर आधारित आहे. आपले मूल जेव्हा एखाद्या मोठ्या संकटात सापडते, तेव्हा अत्यंत साधी आणि भित्री वाटणारी स्त्रीसुद्धा आपल्या लेकरासाठी कशी रणरागिणी बनते, हा थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाल्यास, यात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबत अभिजीत खांडकेकर आणि जितेंद्र जोशी यांच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम चिमुरडी मायरा वायकुळ हिचाही या चित्रपटात सहभाग पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

श्रेयस तळपदेच्या ‘मर्दिनी’ला हिंदीत मोठी मागणी, तरीही अभिनेत्याने मराठीतच का बनवली फिल्म? कारण देत केला बॉलिवूडचा पर्दाफाश



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *