Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. ज्या ज्या मतदारसंघातील खासदारांनी बंडखोरी केली, त्या त्या मतदारसंघात जाऊन ठाकर जाहीर सभा घेत आहेत. सहा खासदारांना ते गद्दार असल्याचे सांगत आहेत. सहा खासदारांना पुढच्या वेळी निवडणुकीत पराभूत करायचं आहे, शिवसैनिकांनी तयार राहावे, असे ठाकरे आपल्या सभेत सांगत आहेत. दरम्यान, सहा खासदारांच्या बंडखोरीवर बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाऊ शकते, असे भाकित केले आहे. तसेच फडणवीसांना संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी आहे
उद्धव ठाकरे धाराशिवच्या सभेत बोलत होते. यावेळी बोलताना, हे खासदार शिंदे सेनेत, मिंधे सेनेत म्हणजेच गुलाम सेनेत गेले आहेत. त्या गुलामांचा काही भवितव्य नाही. कारण वापरा आणि फेका ही भाजपाची नीती आहे. हे सहा खासदार भाजपात का गेले नाही. भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी आहे. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच येत्या काही काळात देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली तर मला नवल वाटणार नाही, असं म्हणत फडणवीसांसोबत कटकारस्थान सुरू असल्याचंही ते म्हणाले.
दिल्लीत बोलावले गेलं आणि…
सध्या मोठं कटकारस्थान सुरू आहे. कारण प्रत्येक गोष्टीला अंत असतो. एखाद्या व्यक्तीनंतर पुढची व्यक्ती कोण, याबाबत विचार केला जातो. दिल्लीत पंतप्रधानपदी बसले आहेत, त्यांच्या जागेवर आता दुसरा नेता कोण? याबाबत विचार सुरू झाला आहे. या पदासाठी भाजपातच रस्सीखेच सुरू झाली आहे. जे-जे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत, त्या सर्वांचा पत्ती 2029 पर्यंत कट होतो की नाही ते बघा. आता तीन वर्ष राहिले आहेत. शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होती. त्यांच्याच चेहऱ्यावर भाजपाने मध्यप्रदेशची निवडणूक जिंकली. चौहान तिथे अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. त्यांना दिल्लीत बोलावले गेलं आणि अडगळीत टाकून देण्यात आलं. आता त्यांचं कोणीही नाव घेत नाही. ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले असते म्हणून त्यांच्यासोबत असं झालं, असंही ठाकरे म्हणाले.
पंतप्रधानपदासाठी स्पर्धक तयार होईल म्हणून…
तसेच, महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्यासोबतही असंच झालं असतं. तेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होत आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जायचं स्वप्न पाहात आहेत. परंतु हा माणूस जर दिल्लीत गेला तर पंतप्रधानपदासाठी स्पर्धक तयार होईल, संघ फडणवीस यांना पाठिंबा देईल, अशी भीती भाजपातील काही लोकांना आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातच संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. ठाकरेंच्या या दाव्यावर आता फडणवीस नेमकी काय प्रतिक्रिया देणार, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.