Mumbai Monsoon Rain: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची मुंबईकर अत्यंत मनापासून वाट पाहत होते, त्या पावसाचे अखेर मुंबईत आगमन झाले आहे. सोमवारी सकाळपासून मुंबईत रिमझिम पावसाच्या (Mumbai Rain news) सरी बरसू लागल्या आहेत. पावसाने अद्याप पुरेसा जोर धरला नसला तरी दक्षिण मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाच्या सरी बरसत आहेत. तसेच ढगांचा गडगडाट सुरु झाल्याने पुढील काही तासांमध्ये पावसाचा (Monsoon) जोर वाढण्याची शक्यता आहे. एरवी मुंबईत 7 ते 8 जूनच्या आसपास पावसाचे आगमन होते. मात्र, यंदा 20 जून उलटून गेला तरी मुंबईत पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते. तसेच शहरावर पाणीकपातीची वेळ ओढावली होती. त्यामुळे पाऊस कधी येणार, याची मुंबईकर प्रतीक्षा करत आहेत. रविवारी सकाळी मुंबई आणि ठाण्यात पावसाच्या तुरळक सरी बरसून गेल्या होत्या. मात्र, नंतर संपूर्ण दिवस कोरडा गेला होता. मात्र, सोमवारी सकाळपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर जास्त आहे. दादरसह, पूर्व आणि पश्चिम उपनगरातदेखील पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. हा मान्सूनपूर्व पाऊस असण्याची शक्यता आहे. कारण, हवामान खात्याने अद्याप मुंबई आणि ठाण्यात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. (Maharashtra Rain News)
Thane Rain news: ठाण्यात पावसाला सुरुवात
ठाण्यातही सोमवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हलक्या स्वरूपाच्या रिमझिम पावसाच्या सरी ठाण्यात सकाळपासून पडताना दिसत आहेत. ठाण्यातील वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, वसई-विरार परिसरात सकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून परिसर प्रसन्न झाला आहे. पुढील काही दिवसांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Monsoon Rain: राज्यात 24 जूनपासून पावसाचा जोर वाढणार
एल निनोचा प्रभाव, कोरडी हवा आणि कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभाव या सर्व घटकांच्या एकत्र येण्यामुळे मान्सूनची वाटचाल संथ झाली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 24 ते 28 जून या कालावधीत हवामान प्रणाली हळूहळू उत्तर किनारपट्टी आणि राज्यांच्या अंतर्गत भागांकडे सरकणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. गेल्या 15 दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यापर्यंत थोडाफार सक्रिय झाला आहे.
Mumbai Water: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8.68 % पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8.68 % पाणीसाठा, मुंबईची तहान भागवण्यासाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर करावा लागणार. मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मालकीच्या अप्पर वैतरणा धरणातून ९० हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख ४० हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने राखीव साठ्याच्या वापरासाठी परवानगीही दिली आहे. आतापर्यंत हा साठा वापरावा लागला नव्हता. मात्र, आता अप्पर वैतरणा धरणातील पाणी साठा शून्यावर आल्यामुळे आता या साठ्याला हात घालावा लागणार आहे.
अप्पर वैतरणा वैतरणा – ० टक्के
मोडकसागर – २३.८० टक्के
तानसा- ३.०४ टक्के
मध्य वैतरणा- १०.३४ टक्के
भातसा- ७.९९ टक्के
विहार -४१.२५ टक्के
तुलसी- २२.०२ टक्के
एकूण -८.६८ टक्के
पाणीसाठ्याच्या नियोजनाकरिता पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुंबईत आधीच १५ मे पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही १७ जून २०२६ पासून मर्यादा घालण्यात आल्या आहेत. बांधकामे व जलतरण तलावांना दिलेल्या जलजोडण्या खंडित करण्यात येणार आहेत. तसेच औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्ट्स क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे
आणखी वाचा
आला रे आला… पुण्यातही मुसळधार, कोकणात पावसाची संततधार; साताऱ्यातही बरसला, बळीराजाला दिलासा
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?