Lord Shiv: 12 ज्योतिर्लिंग आणि 12 राशींचा घनिष्ठ संबध! तुमच्या राशीचं ज्योतिर्लिंग कोणतं? श्रावणात भोलेनाथ होतील प्रसन्न, आयु्ष्याचं होईल सोनं..


Lord Shiv: श्रावण महिना अवघ्या काही दिवसांतच सुरू होतोय. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि तो विशेषतः भगवान शिवांच्या उपासनेसाठी समर्पित असतो. धार्मिक मान्यतेनुसार, जिथे जिथे भगवान शिव प्रकट झाले, तिथे 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना झाली असे मानले जाते. पुराणांमध्ये प्रत्येक ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व दिले आहे. ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शिवाच्या दिव्य प्रकाशाचे प्रतीक आहे. भारतात 12 प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत, असे म्हटले जाते की, 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने भक्तांची सर्व दुःखे दूर होतात, तसेच व्यक्तीच्या मागील जन्मातील सर्व पापे नाहीशी होतात. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर, घृष्णेश्वर, इत्यादी आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंग एका विशिष्ट राशीशी संबंधित आहे.

रामेश्वरम ज्योतिर्लिंग (मेष): ज्योतिषशास्त्रानुसार, रामेश्वरम ज्योतिर्लिंग मेष राशीशी संबंधित आहे. सूर्यवंशी वंशातील भगवान रामाने वनवासात असताना या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. मेष राशीत उच्चस्थानी असलेला सूर्य, वैवाहिक जीवनातील चैतन्य आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सुसंवाद आणि स्थिरता वाढते, असा विश्वास आहे.

सोमनाथ ज्योतिर्लिंग (वृषभ): सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा संबंध वृषभ राशीशी आहे. गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यात स्थित असलेले हे पृथ्वीवरील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. शास्त्रानुसार, चंद्रदेवाने, उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि क्षयरोगाचा शाप दूर करण्यासाठी या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. वृषभ राशीच्या व्यक्तींना भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.

नागेश्वर ज्योतिर्लिंग (मिथुन): बुध ग्रह जिचा स्वामी आहे, अशा मिथुन राशीचा संबंध नागेश्वर ज्योतिर्लिंगाशी आहे. गुजरातच्या द्वारका जिल्ह्यात स्थित असलेले हे ज्योतिर्लिंग राहू, म्हणजेच सर्पाचे प्रतीक आहे. मिथुन राशीच्या लोकांना नागेश्वर ज्योतिर्लिंगावर झेंडूची फुले, शमीची पाने आणि बेलपत्री अर्पण करून पूजा आणि ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. या पूजेमुळे मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक वाढ होते, असा विश्वास आहे.

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (कर्क): ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कर्क राशीशी संबंधित आहे. येथील ‘ओम’ हे ज्योतिर्लिंगाचे ज्ञान आणि आध्यात्मिक क्षमतेचे प्रतीक आहे. हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशात आहे. कर्क राशीच्या लोकांना या ज्योतिर्लिंगाची आणि आजूबाजूच्या शिवलिंगांची बेलपत्री, पाणी, दूध अर्पण करून आणि ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करून पूजा करण्यास प्रोत्साहित केले जाते.

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग (सिंह): वैद्यनाथ ज्योतिर्लिंग सिंह राशीशी संबंधित आहे. सूर्याच्या अधिपत्याखाली असलेल्या सिंह राशीच्या लोकांना या ज्योतिर्लिंगाची पूजा करून आरोग्य, कौटुंबिक आणि राजकीय समस्यांवर उपाय मिळू शकतात. झारखंडच्या देवघर जिल्ह्यात स्थित असलेले हे ज्योतिर्लिंग आपल्या भक्तांना उत्तम आरोग्य, संतती आणि मंत्रसिद्धीचा आशीर्वाद देते, असा विश्वास आहे.

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (कन्या): मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कन्या राशीशी संबंधित आहे. कन्या राशीत उच्चस्थानी असलेला बुध ग्रह वाणी, व्यवसाय आणि शिक्षणाचे प्रतिनिधित्व करतो. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम पर्वताच्या शिखरावर असलेल्या या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने वाणी, व्यवसाय आणि शिक्षण यांसारख्या जीवनातील पैलूंशी संबंधित आशीर्वाद मिळू शकतात.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (तूळ): महाकालेश्वर ज्योतिर्लिंग तूळ राशीशी संबंधित आहे. उज्जैनच्या पवित्र शहरात स्थित असलेले हे ज्योतिर्लिंग ‘काळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनीचे प्रतिनिधित्व करते. या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने उत्तम आरोग्य लाभते आणि अकाली मृत्यूपासून बचाव होतो, असा विश्वास आहे.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (वृश्चिक): घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा संबंध वृश्चिक राशीशी आहे. मंगळ आणि केतू स्वामी असलेल्या वृश्चिक राशीत जन्मलेल्या व्यक्तींना या ज्योतिर्लिंगाच्या पूजेचा लाभ होऊ शकतो. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित असलेले हे ज्योतिर्लिंग मंगळ आणि केतूचे नकारात्मक प्रभाव दूर करते, असा विश्वास आहे.

काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग (धनु): काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचा संबंध धनु राशीशी आहे. धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु जीवनाचे प्रतीक आहे आणि केतू मोक्षाचे प्रतीक आहे. हे ज्योतिर्लिंग व्यक्तींना त्यांच्या मोक्षप्राप्तीच्या आध्यात्मिक प्रवासात मदत करते. पवित्र वाराणसी शहरात स्थित असलेले काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे धनु राशीच्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग (मकर): भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा संबंध मकर राशीशी आहे. मकर राशीत मंगळ ग्रह उच्च असतो आणि ज्यांच्या जन्मपत्रिकेत मंगळाची स्थिती कमजोर आहे, त्यांना या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने दिलासा मिळू शकतो. हे महाराष्ट्रातील पुणे येथील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले आहे.

केदारनाथ ज्योतिर्लिंग (कुंभ): केदारनाथ ज्योतिर्लिंगाचा संबंध कुंभ राशीशी आहे. उत्तराखंडमध्ये स्थित असलेले हे मंदिर कुंभ राशीच्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करते, असा विश्वास आहे. केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे किंवा त्याच्या जवळील शिवलिंगांचे ध्यान आणि पूजा केल्याने आध्यात्मिक वाढ आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळू शकतो.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (मीन): त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा संबंध मीन राशीशी आहे. मीन राशीत उच्चस्थानी असलेला शुक्र ग्रह विलासिता, आराम आणि ऐहिक सुखांचे प्रतीक आहे. हे ज्योतिर्लिंग जीवनाच्या या पैलूंशी संबंधित आशीर्वाद प्रदान करते, असा विश्वास आहे. ज्यांच्या जन्मपत्रिकेतील सहाव्या घरात शुक्र आहे, त्यांना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.

श्रावण 2026 कधीपासून सुरू होतोय? (Shravan 2026)

धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिना भगवान शिवांची उपासना, रुद्राभिषेक, बेलपत्र अर्पण, सोमवारी व्रत आणि शिवमंत्र जपासाठी अत्यंत शुभ मानला जातो. महाराष्ट्रात (अमावास्यांत पंचांगानुसार) श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026, गुरुवारपासून सुरू होऊन 11 सप्टेंबर 2026, शुक्रवारपर्यंत राहील.

श्रावणी सोमवार 2026

  • 17 ऑगस्ट 2026 – पहिला श्रावण सोमवार
  • 24 ऑगस्ट 2026 – दुसरा श्रावण सोमवार
  • 31 ऑगस्ट 2026 – तिसरा श्रावण सोमवार
  • 7 सप्टेंबर 2026 – चौथा श्रावण सोमवार

हेही वाचा

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जूनचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *