Last Updated:
Gokul Gite: नाशिक विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतमोजणीतून अत्यंत धक्कादायक आणि राजकीय गणिते बदलून टाकणारी बातमी समोर येत आहे.
नाशिक: नाशिक विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतमोजणीतून अत्यंत धक्कादायक आणि राजकीय गणिते बदलून टाकणारी बातमी समोर येत आहे. निवडणूक रिंगणात अपक्ष उतरलेले भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत जोरदार मुसंडी मारली असून ते मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. गोकुळ गीते यांनी निर्णायक आघाडी घेतली असून विजय निश्चित असल्याचा दावा केला जात आहे. गोकुळ गीतेंच्या या आघाडीमुळे महायुतीला, विशेषतः शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे.
मतमोजणी सुरु होण्याआधीच भाजप बंडखोर गोकुळ गीते यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले. ते म्हणाले, “मी केवळ माझा प्रचार थांबवला होता, निवडणुकीतून अधिकृत माघार घेतली नव्हती. मी प्रचार थांबवलेला असतानाही मतदारांनी मला उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. हा मतदारांचा कौल पाहता, माझा विजय निश्चित होईल याची मला पूर्ण खात्री आहे.”
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या फेरीच्या मतमोजणीत झालेल्या १५० मतांपैकी तब्बल १०० हून अधिक मतांचा कोटा एकट्या गोकुळ गीते यांनी पूर्ण केला आहे. पहिल्याच फेरीत मिळालेल्या या एकतर्फी मतदानामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बॅकफूटवर गेले आहेत.
नाशिकची राजकीय गणिते पूर्णपणे बदलली!
काही वेळापूर्वीच गोकुळ गीते यांनी “मी फक्त प्रचार थांबवला होता, माघार घेतली नव्हती; मतदारांचा मला उत्स्फूर्त पाठिंबा आहे” असा दावा केला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीचे आकडे समोर आल्यानंतर त्यांचा हा दावा तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. या धक्कादायक आकड्यांमुळे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतफुटी किंवा क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
Nashik,Maharashtra
